वाशी मार्केटमध्ये हापूस दाखल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्यांची संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 12:32 IST2019-02-27T12:24:54+5:302019-02-27T12:32:40+5:30
अवीट गोडीने भुरळ घालणारा यावर्षीच्या हंगामातील हापूस बाजारात दाखल झाला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज २५० ते ३०० पेट्या विक्रीला येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्या अधिक आहे. मोहोरावर व फळांवर थ्रीप्सचा प्रादूर्भाव झाला असून, महागडी कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्याने बागायतदार त्रस्त झाले आहेत.

वाशी मार्केटमध्ये हापूस दाखल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्यांची संख्या अधिक
रत्नागिरी : अवीट गोडीने भुरळ घालणारा यावर्षीच्या हंगामातील हापूस बाजारात दाखल झाला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दररोज २५० ते ३०० पेट्या विक्रीला येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्या अधिक आहे. मोहोरावर व फळांवर थ्रीप्सचा प्रादूर्भाव झाला असून, महागडी कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्याने बागायतदार त्रस्त झाले आहेत.
यावर्षीच्या हंगामातील विविध संकटांचा सामना करीत वाशी मार्केटमध्ये सुरूवातीचा आंबा दाखल झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण अल्प तर आहेच, शिवाय दरही खालावलेले आहेत. १५०० ते ४००० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. सध्या दमट हवामान असल्यामुळे आंब्याचा देठ कुजण्याचा प्रकार वाढला असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दि. १५ मार्चनंतर तापमान वाढल्यास देठ कुजण्याचा प्रकार थांबेल.
थ्रीप्सचे संकट यावर्षी सुरूवातीपासून राहिले आहे. डिसेंबरपासून मोहोरावर असलेला थ्रीप्स कीटकनाशकांच्या फवारणीनंतरही नष्ट होत नाही. तुडतुड्याबरोबर कीड रोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. बदलत्या हवामानामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कीटकनाशकांच्या फवारणीनंतरही कीडीचा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव तसाच राहात आहे. काही ठिकाणी मोहोर काळा पडला असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. करपलेला मोहोर सुधारण्याचा अवधी निघून गेल्याने शेतकरी बांधव चिंतेत आहेत.
हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबबत युरोपीय देशांपाठोपाठ आता यावर्षीपासून आखाती देशांनीही कडक भूमिका घेतली आहे. फळांमध्ये रासायनिक अंश सोडणाऱ्या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आल्यामुळे अशा प्रकारची फवारणी झालेला हापूस न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हवामानात आता बदल होऊ लागला असून, उष्णता वाढत आहे. त्यामुळे दि. १५ मार्चनंतर येणारा आंबा नक्कीच चांगला, मधुर चवीचा असणार आहे. शिवाय आवकही त्यावेळी वाढेल. होळीनंतर उत्तरप्रदेशातील भय्ये मुंबईत दाखल होतात. मुंबई उपनगरात विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे आवक वाढली तरी दर बऱ्यापैकी स्थिर राहतात. शिवाय रेसीड्यू फ्री आंबा चाचणीसाठी योग्य असणार आहे.
कृषी विभागाने जिल्हाभरात थ्रीप्समुळे करपलेल्या बागायतींचा पंचनामा करून फळपीक विमा कंपनीकडे याबाबतचा अहवाल देणे गरजेचे आहे. महागडी कीटकनाशके पाहून ज्या बागायतदारांनी आंबा वाचविला आहे, त्या बागायतदारांचे पैसे होण्यासाठी दर टिकून राहाणे महत्त्वाचे आहे. भौगोलिक निर्देशांक याचवर्षी प्राप्त झाले असून, या निकषावर हापूसचे दर स्थिर राहाणे आवश्यक आहे.
- राजन कदम,
बागायतदार, शीळ-मजगाव.