उद्धव ठाकरेंचे उत्तर शाळेतील भांडणासारखे, ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर मंत्री उदय सामंतांनी केलं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:13 IST2025-04-21T18:13:17+5:302025-04-21T18:13:41+5:30
तीनही नेत्यांची मने घट्ट

उद्धव ठाकरेंचे उत्तर शाळेतील भांडणासारखे, ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर मंत्री उदय सामंतांनी केलं भाष्य
रत्नागिरी : आमच्यातील वाद हे महाराष्ट्रापेक्षा छाेटे आहेत, असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवली आहे. पण, समाेरच्यांकडून कशा पद्धतीने ते कमी लेखण्यात आलं हे दिसलं आणि उद्धव ठाकरे यांचे उत्तर म्हणजे शाळेतील भांडणासारखे असल्याचे भाष्य राज्याचे उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना केले.
रत्नागिरी दाैऱ्यावर आलेल्या मंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी मुलाखतीत महाराष्ट्र आपल्या सगळ्यांपेक्षा माेठा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आमची भांडणं महाराष्ट्रापेक्षा छाेटी आहेत, हे त्यांनी सांगितले. पण, त्याची लिंक कशी जाेडली गेली, का जाेडली गेली, कशामुळे जाेडली गेली, हे माहीत नाही.
राज ठाकरे सकारात्मक बाेलले असतील, पण समाेरून अटी, शर्तींंवर ते आमच्यासाेबत आले पाहिजेत, भाजपाबराेबर त्यांनी बाेलता कामा नये, असे सांगण्यात आले. हे प्राथमिक शाळेतील भांडणासारखं राजकारणात सुरू झालं आहे. त्याचा विचार करण्याएवढे राज ठाकरे नक्कीच माेठे आहेत, असेही मंत्री सामंत म्हणाले.
तीनही नेत्यांची मने घट्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची मने घट्ट आहेत, एकत्र आहेत आणि काॅंक्रीट आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून आम्ही जिंकू असा विश्वास आहे.
अटी घालून नमवणे शक्य नाही
युती काेणाबराेबर करायची हे राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण, ते स्वत:चा विचार असणारे आणि स्वत:चा विचार कधीही बाजूला न करणारे एक नेते आहेत. त्यामुळे त्यांना अटी घालून नमवणे काेणाला शक्य नाही. अटी, शर्ती घालून झुकणारे राज ठाकरे नाहीत. अटी घातल्यावर ते काेणाबराेबर युती करतील, असे मला वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.