रत्नागिरीला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पदाची संधी?, आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:29 IST2025-03-05T13:28:24+5:302025-03-05T13:29:02+5:30
नाराजीमुळे दखल?

रत्नागिरीला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पदाची संधी?, आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस
चिपळूण : उद्धवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याने गेले महिनाभर विरोधी पक्षनेतेपदाभोवती घोंगावणारे वादळ काहीसे शांत झाले आहे. यापूर्वी रामदास कदम यांनी विरोध पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती. आता महाविकास आघाडीकडून या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यास कोकणला तिसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळेल.
विरोधी पक्षांकडे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाबाबत प्रश्नचिन्हच होते. सरकार सक्षमपणे चालविण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची आवश्यकता असते आणि त्याच भावनेतून कमी संख्याबळ असतानाही विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीला देण्याचे निश्चित करण्यात आले. महाविकास आघाडीमध्ये या पदासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवत हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पदासाठी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह उद्धवसेनेत उत्साह निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार जाधव हे पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. आपली क्षमता असूनही आपल्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही, असे बोलून आमदार जाधव यांनीही आपली नाराजी मांडली होती. आता पक्षाने विरोधी पक्षनेतेपदाची संधी देण्याचा विचार केल्याने या निर्णयाचे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.
नाराजीमुळे दखल?
- उद्धवसेनेला आमदार भास्कर जाधव यांच्या रूपाने कोकणात एकमेव जागेवर यश मिळाले आहे. ३३ वर्षांहून अधिक काळ ते राजकारणात सक्रिय आहेत. सहा वेळा ते आमदार झाले आहेत. राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूषवण्याचा मानही कोकणात केवळ त्यांच्याकडेच आहे.
- यावेळी विरोधी पक्षनेतेपदासाठी आपली निवड व्हावी, ही त्यांची अपेक्षा होती. त्याबाबत पक्षाकडून काहीच हालचाल होत नसल्याने ते काहीसे नाराज होते. त्यांच्या या नाराजीची दखल घेतल्याची प्रतिक्रिया त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.