उदय सामंत यांचा शाखाध्यक्षपदाचा राजीनामा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या सभेत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:07 IST2025-09-17T16:06:25+5:302025-09-17T16:07:33+5:30
नाट्यसंमेलनाचा समारोप रत्नागिरीत

उदय सामंत यांचा शाखाध्यक्षपदाचा राजीनामा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या सभेत घोषणा
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार विद्यमान कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांच्याकडे साेपविण्यात आला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीत मंत्री सामंत यांनी सांगितले की, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचा विश्वस्त असल्यामुळे नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती अंतर्गत कार्यरत असलेल्या अन्य शाखेचे अध्यक्ष असणे उचित वाटत नाही. स्वखुशीने अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन अध्यक्षपदाची निवड होईपर्यंत रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार शाखेचे विद्यमान कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांच्याकडे देण्याची सूचना मंत्री सामंत यांनी केली. त्याला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.
नाट्यसंमेलनाचा समारोप रत्नागिरीत
शंभराव्या नाट्यसंमेलनाचा समारोप रत्नागिरीत होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या संमेलनाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. हे संमेलन आपण सर्वांनी मिळून यशस्वी करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.