चिपळुणात जॅक लावून उचलले दुमजली घर!, खर्च, किती दिवस, कसं सुरु होत काम..वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:58 IST2025-12-16T16:57:36+5:302025-12-16T16:58:07+5:30

पुरापासून बचावासाठी पहिल्या टप्प्यात दोन फूट उंच, सहा फूट वर नेणार

Two story house lifted by jacking in Chiplun to save it from floods | चिपळुणात जॅक लावून उचलले दुमजली घर!, खर्च, किती दिवस, कसं सुरु होत काम..वाचा सविस्तर

चिपळुणात जॅक लावून उचलले दुमजली घर!, खर्च, किती दिवस, कसं सुरु होत काम..वाचा सविस्तर

चिपळूण : चिपळूण शहराला गेली २५ वर्षांपासून कायमस्वरुपी पुराचा धोका निर्माण झाला आहे. २०२१ मध्ये तर महापुराने सर्वाधिक उंची गाठली. त्यावर मात करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. आता नागरिकांनीही वैयक्तिक पातळीवर उपाय सुरू केले आहेत. शहरातील खेंड येथील प्रमोद वेल्हाळ यांनी घराचे बांधकाम न पाडता १५० जॅकच्या सहाय्याने मूळ बांधकाम सहा फूट उंच करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात ते सव्वा दोन फूट उंच झाले आहे.

चेन्नईतील एक खासगी कंपनी हे काम करत असून, जॅकद्वारे घराची उंची वाढविण्याचा चिपळुणातील हा पहिलाच प्रयोग आहे. मूळचे नरवण (ता. गुहागर) येथील अभियंता प्रमोद वेल्हाळ हे जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी खेंड परिसरात २०१५ मध्ये १३०० स्वेअर फुटाचे दुमजली घर उभे केले. मात्र, पावसाळ्यात घरात पाणी येण्याची समस्या त्यांना सतावत होती. घराचे बांधकाम तोडून पुन्हा त्याची उभारणी करणे अधिक खर्चिक होते. त्यामुळे राहते घर कशा पद्धतीने उंच करता येईल, यावर त्यांचा अभ्यास सुरू होता.

वेल्हाळ यांना जॅकद्वारे घराची उंची वाढवता येत असल्याची माहिती इंटरनेटवर मिळाली. पुणे, मुंबईत अशा पद्धतीची कामे केली जातात. मात्र चिपळुणात असा प्रयोग कधी झाला नव्हता. जॅकच्या साह्याने घराची उंची वाढण्याचा निर्णय वेल्हाळ यांनी घेतला. चेन्नई येथील एका कंपनीने हे काम घेतले.

कसे सुरू झाले काम

  • प्रथम घराचे बेड काँक्रीट तोडून खोदाई करण्यात आली. पिलरचा भाग मोकळा झाल्यावर लिंटेलच्या खाली मजबूत बिम टाकण्यात आले. त्यावर जॅक लावून घराचे बांधकाम उचलण्यास सुरुवात केली.
  • गेली महिनाभर हे काम सुरू असून, घर सहा फूट उचलण्यासाठी १५० जॅक लावले आहेत. जॅक लावण्यासाठी लागणारी सिमेंट विट त्यांनी उंब्रजवरून आणली. पहिल्या टप्प्यात कामगारांची संख्या जास्त होती. मात्र, आता केवळ ५ कामगार नियमित काम करत आहेत.
  • या बांधकामासाठी कंपनीने मजबूत साहित्याचा वापर केला आहे. त्यामुळे शेकडो टन वजन असलेली इमारत जॅकच्या साह्याने उचलली जात आहे.


१५ लाख रुपये खर्च

पहिल्या टप्प्यात हे दुमजली घर सव्वा दोन फुटांवर उचलले गेले आहे. महिनाभरात ते सहा फूट उचलण्यात येणार आहे. या संपूर्ण बांधकामाला सुमारे १५ लाख खर्च अपेक्षित असल्याचे वेल्हाळ यांनी सांगितले.

चिपळुणातील पहिलाच प्रयोग

जॅकद्वारे घराची उंची वाढवली तरी इमारतीला तडे जाणे अथवा ती कोसळण्याचा धोका नाही. राहते घर जॅकच्या साह्याने दुसऱ्या जागी स्थलांतर करता येते. याशिवाय त्याची उंचीही वाढविता येते. या कामाची गॅरंटी कंपनीकडून लेखी स्वरुपात देण्यात आली आहे. यापूर्वी लांजा तालुक्यात आंजणारी येथे एक मशीद याच तंत्राच्या साह्याने स्थलांतरित केली आहे. मात्र, चिपळुणातील वेल्हाळ यांचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.

Web Title: Two story house lifted by jacking in Chiplun to save it from floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.