Accident: दापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक, १६ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 13:04 IST2022-08-25T12:57:24+5:302022-08-25T13:04:04+5:30
अपघातात दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.

Accident: दापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक, १६ जण जखमी
शिवाजी गोरे
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड रोडवर दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात १६ जण जखमी झाले आहेत. उर्वरीत किरकोळ जखमी रुग्ण उपचार न घेताच निघून गेले असल्याची माहिती मिळाली. मौजे दापोली फाट्याजवळ आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत माहिती अशी की, बोरीवली-दापोली बस क्रमांक (MH-२०-BL-२२४३) व दापोली-मुरादपूर (MH-०७-C-७२५३) या दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये अंदाजे २५ जण जखमी झाले असून यात कॉलेज व शाळकरी मुलांचा समावेश आहे. दापोली पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे. आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांनी घटनास्थळी पाहणी करून जखमी रुग्णांना तात्काळ मदत देणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा केला असून दोषी वाहन चालकावर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.