रत्नागिरी जिल्ह्यात प्रांताधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 15:56 IST2019-02-22T15:53:27+5:302019-02-22T15:56:26+5:30
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काम वेगाने सुरू झाले आहे. राजापूर, दापोलीचे उपविभागीय अधिकारी तर रत्नागिरी, खेड, दापोली येथील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. निवडणुकांमुळे त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात प्रांताधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या
रत्नागिरी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काम वेगाने सुरू झाले आहे. राजापूर, दापोलीचे उपविभागीय अधिकारी तर रत्नागिरी, खेड, दापोली येथील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. निवडणुकांमुळे त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या बदल्यांमध्ये नाणार प्रकल्पामुळे चर्चेत आलेले उपविभागीय अधिकारी अभय करंगुटकर यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी विनोद गोसावी यांची नियुक्ती झाली आहे. दापोलीचे उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांची नियुक्ती झाली आहे.
त्याशिवाय तहसीलदार संवर्गात रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांची बदली तहसीलदार कुडाळ म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रत्नागिरीचे परिचालन अधिकारी शशिकांत जाधव यांची नियुक्ती केली आहे.
खेडचे तहसीलदार अमोल कदम यांची बदली मुरबाडच्या तहसीलदारपदी झाली आहे. त्यांच्या जागी पोलादपूरचे तहसीलदार शिवाजी गोविंद जाधव यांची नियुक्ती झाली आहे. दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव यांची बदली रोहा तहसीलदार म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी मालवणचे तहसीलदार समीर घारे रुजू होणार आहेत.
त्याशिवाय रत्नागिरीचे रजा राखीव तहसीलदार राजेंद्र बिर्जे यांची बदली सिंधुदुर्ग येथे तहसीलदार- पुनर्वसन म्हणून झाली आहे, तर शेतजमीन व न्यायाधिकार विभागाचे अपर तहसीलदार परीक्षित पाटील यांची बदली मुरुडचे तहसीलदार म्हणून झाली आहे.
अतिरिक्त कार्यभार
आगामी निवडणुका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातील बहुतांशी अधिकारी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यातच महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने अतिरिक्त कार्यभार देण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने अधिकारी हजर होईपर्यंत अतिरिक्त पदाचा कार्यभार पडणार आहे.