थर्टी फर्स्ट, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली; समुद्रकिनारे गर्दीने फुलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:54 IST2024-12-30T12:53:57+5:302024-12-30T12:54:59+5:30
सर्व हाॅटेल्स, लाॅज बुक

थर्टी फर्स्ट, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली; समुद्रकिनारे गर्दीने फुलली
रत्नागिरी : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची पावले काेकणाकडे वळली आहेत. त्यामुळे मुंबई - गाेवा महामार्गावर वाहनांची रीघ लागली असून, जिल्ह्यातील गणपतीपुळे, दापाेली, गुहागर येथील समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत. सर्व हाॅटेल्स, लाॅज बुक झाले आहेत. संपूर्ण जिल्हा पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.
नाताळची सुट्टी पडली की, थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटक काेकणात दाखल हाेत आहेत. यावर्षीही पर्यटकांनी काेकणाला पसंती दिली आहे. त्यातच शनिवार, रविवार सुटी आल्याने पर्यटक आधीपासून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळेसह आरे-वारे, काजिरभाटी त्याचबराेबर मंडणगडमधील वेळास, दापाेलीतील आंजर्ले, हर्णै, मुरुड, लाडघर, कर्दे, दाभाेळ आणि गुहागरातील गुहागर, वेळणेश्वर, हेदवी या ठिकाणी माेठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.
मुंबई, पुणे, सांगली, सातारा, काेल्हापूर या ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांनी समुद्रकिनारी भागाला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर माेठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे या भागातील हाॅटेल, लाॅज फुल्ल झाले आहेत. पर्यटकांमुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे गजबजून गेली आहेत.
पर्यटक ‘श्रीं’च्या दर्शनाला
श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे दिवसाला २५ ते ३० हजार पर्यटक ‘श्रीं’च्या दर्शनासाठी येत आहेत. मंदिर प्रशासनातर्फे भाविकांसाठी दोन वेळ मोफत महाप्रसादाची सुविधा उपलब्ध आहे. सकाळी व सायंकाळी ३,५०० ते ४,००० भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.
शिरगाव परिसरात वाहतूक कोंडी
गणपतीपुळे येथे जाण्यासाठी आरे-वारे मार्ग साेयीस्कर आणि सुलभ ठरत आहे. मात्र, शिरगाव येथील अरुंद रस्त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण हाेत आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. दोन मोठी वाहने समाेरासमोर आल्यास वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. या ठिकाणी रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक काेंडीची समस्या निर्माण हाेत आहे. याबाबत पाेलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.