रत्नागिरी : सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील एक दाम्पत्य गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जाताना आरेवारे येथे फोटो काढण्यासाठी थांबले, पण ते गाडीतून उतरल्यानंतर त्यांची गाडी उतारामुळे लगतच असलेल्या १०० ते १५० फूट दरीत काेसळली. सुदैवाने गाडीमध्ये कोणीही नव्हते. यात गाडीचे बरेच नुकसान झाले आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडला.आष्टा येथील शिंदे नावाचे दाम्पत्य गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जात होते. वाटेत आरेवारे येथील निसर्ग पाहून ते दोघेही खाली उतरले. ते फोटो काढत असताना अचानक उतारावरून त्यांची गाडी लगतच्या १०० ते १५० फूट खोल दरीत काेसळली.
आपण गाडीतून उतरताना गीयर टाकला होता आणि हँडब्रेकही लावला होता, असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. मात्र, तरीही गाडी खाली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. क्रेनची व्यवस्था करून गाडी बाहेर काढण्याचे या दाम्त्याचे प्रयत्न सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.पाेलिसांकडून दखलपोलिसांची ११२ ही मदतीची व्हॅन दुपारी गणपतीपुळे मार्गावरील नेवरे येथे गेली होती. तेथून परत येत असताना आरेवारे येथे त्यांना गर्दी दिसली. गाडी दरीत गेल्याची घटना कळल्यानंतर त्यांनी या दाम्पत्याकडे चौकशी केली आणि काय मदत हवी आहे, ते विचारले. मात्र, या दाम्पत्याने आमची काही तक्रार नाही आणि क्रेनची व्यवस्था केली असल्याचे सांगितले.