मुलीला धमकी; आरोपीला कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 13:47 IST2019-06-20T13:46:15+5:302019-06-20T13:47:49+5:30
खेड तालुक्यातील भरणे शिंदेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधून तिचा विनयभंग करतानाच तिला पळवून नेण्याची धमकी दिल्या प्रकरणी खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

मुलीला धमकी; आरोपीला कारावास
खेड : तालुक्यातील भरणे शिंदेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधून तिचा विनयभंग करतानाच तिला पळवून नेण्याची धमकी दिल्या प्रकरणी खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
परिमल चित्तरंजन रॉय (३५, आशीर्वाद कॅन्टीन, साकीनाका, मुंबई) हा काही वर्षांपूर्वी खेड - भरणे येथे एका चायनीज गाडीवर कामाला होता. यावेळी त्याची ओळख पीडित मुलीच्या वडिलांसोबत झाली.
त्यानंतर चायनीज दुकानातील काम सोडल्यानंतर परिमल हा मुंबई येथे कामाला गेला. परंतु, जाण्यापूर्वी त्याने पीडितेच्या वडिलांचा मोबाईल नंबर घेतला होता.
मुंबईत काम करताना १५ जुलै २०१७ ते १७ आॅगस्ट २०१७ या कालावधीत परिमल याने सतत निरनिराळ्या फोनवरून पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केला व मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली. पीडित मुलीने काही वेळेला फोन उचलला असता तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे बोलून पळवून नेण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पीडित मुलगी व तिच्या वडिलांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी याप्रकरणी तपास करून परिमल याला गजाआड केले.
खेड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीअंती १८ जून रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी परिमल रॉय याला दोन वर्षे साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.