ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा लवकरच - मंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:12 IST2025-02-21T17:11:44+5:302025-02-21T17:12:10+5:30

रत्नागिरी : ऑपरेशन टायगर मोहिमेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या दोन टप्प्यांत रत्नागिरीत अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ...

Third phase of Operation Tiger coming soon says Minister Uday Samant | ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा लवकरच - मंत्री उदय सामंत

ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा लवकरच - मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : ऑपरेशन टायगर मोहिमेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या दोन टप्प्यांत रत्नागिरीत अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. आता लवकरच रत्नागिरीत तिसरा टप्पा होणार असून, त्यातही अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत दाखल होतील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

गुरुवारी आपल्या रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सामंत यांनी विविध विषयांवर भाष्य केले. रत्नागिरीमध्ये कांदळवन प्रशिक्षणाची बैठक बड्या हॉटेलमध्ये झाली आणि चार तासांच्या प्रशिक्षणावर नऊ लाख रुपये खर्च करण्यात आले. प्रसारमाध्यमांमधून हे प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यावर मोठी चर्चा झाली. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश आपण जिल्हाधिकारी यांना दिले असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींबाबतचे निकष कडक पद्धतीने पाहिले जाणार आहेत. ज्यांनी आयकरामध्ये आपले उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक दाखवले असेल अशा बहिणींचे आणि चारचाकी असलेल्या बहिणींचे नाव यातून वगळले जाईल. मात्र, सरसकट योजना बंद होणार नाही, असे ते म्हणाले. अर्थात चर्चा केवळ बंद झालेल्या अनुदानाची होती. २ कोटी ४० लाख महिलांना याचा लाभ मिळाला. यातील नऊ लाख बहिणींची नावे वगळली गेली. त्याचीच चर्चा होते. पण २ कोटी ३१ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे, यावर माध्यमे बोलत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

स्मार्ट सिटीची कामे आठवडाभरात सुरू होणार

रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी बनविण्यासाठी एमआयडीसीकडून निधी दिला जात आहे. त्यासाठी एमआयडीसीचे मुख्य अभियंता लवकरच रत्नागिरीत येतील आणि आठवडाभरात ही कामे तातडीने सुरू होतील, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

सर्व शहरांमध्ये सीसीटीव्ही

जिल्ह्यात प्रत्येक शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्याकडे दिला आहे. जिल्हा नियोजन समितीकडून त्यासाठी निधी दिला जाईल, असे ते म्हणाले.

Web Title: Third phase of Operation Tiger coming soon says Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.