Ratnagiri Politics: महायुतीचे अजून ठरेना, आघाडीचे काही कळेना; सर्वच पक्षांना नगराध्यक्ष पदाचे वेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:26 IST2025-11-07T13:23:06+5:302025-11-07T13:26:18+5:30
Local Body Election: इच्छुकांची संख्या वाढल्याने एकत्र येण्यात अडचणी

Ratnagiri Politics: महायुतीचे अजून ठरेना, आघाडीचे काही कळेना; सर्वच पक्षांना नगराध्यक्ष पदाचे वेध
चिपळूण : महायुतीनेच निवडणुका लढणार, असे सतत सांगणारी नेतेमंडळी आणि आपल्याच पक्षाला नगराध्यक्ष पद हवे म्हणून प्रचाराची राळ उडविणारे इच्छुक यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीबाबत अजूनही सावळागोंधळच सुरू आहे. महायुतीचे काही ठरेना आणि महाविकास आघाडीचे काही कोना, अशी कार्यकर्त्यांची स्थिती झाली आहे. दरम्यान, शक्रवारी (दि.७ नोव्हेंबर) मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची चर्चा असून, या बैठकीत महायुतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही संघटनांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्यामुळे स्थानिक राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती अंतिम होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्धवसेना आणि काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडीचे नवीन समीकरण जमते का, हेही महायुतीच्या पथकाकडून बारकाईने पाहिले जात आहे. आघाडीतही प्रत्येक पक्षाला बहुतांश ठिकाणचे नगराध्यक्षपद अपेक्षित असल्याने आघाडी होणार की नाही, याबाबत कोणीच छातीठोक बोलण्यास तयार नाहीत.
मुंबईत शुक्रवारी होणारी महायुतीची बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत महायुतीवर निर्णय घेतला जाणार की स्वबळावर लढण्याचा पर्याय स्वीकारला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची अंतर्गत तयारी केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज घेऊन त्यांची यादी तयार ठेवण्यात आली आहे. हीच यादी स्वबळावरचा निर्णय झाल्यास तत्काळ वापरली जाऊ शकते.
स्थानिक स्तरावर काही ठिकाणी निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याने इच्छुकांमध्ये तणाव वाढला आहे. वेळेची टंचाई आणि उमेदवारांची चिंता निवडणुकीसाठी कालावधी मर्यादित असल्याने प्रचार आणि संघटनात्मक तयारीसाठी फारसा अवधी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून गुपचूप तयारी सुरू आहे. महायुती किंवा आघाडीचा निर्णय लांबणीवर गेल्यामुळे काही उमेदवार गोंधळात सापडले आहेत, तर पक्षांतर्गत नाराजीचे सूरही उमटू लागले आहेत.
दोन दिवसांत ठरणार राजकीय दिशा ?
महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही आपले आतापर्यंतचे गटबांधणीचे गणित जपून ठेवत असल्याने स्थानिक स्तरावर प्रबळ असलेल्या स्वबळाच्या घटकांना संधी उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे महायुतीसह आघाडीतही जागावाटप आणि नगराध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरून राजकीय समीकरणांचा तिढा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत कोण आघाडी बांधतो आणि कोण स्वबळावर उतरतो, यावरच पुढील राजकीय दिशा अवलंबून असणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी अडले
आतापर्यंत महायुतीच्या दोन बैठका झाल्या. या बैठकीत महायुतीचा नारा दिला गेला असला, तरी नगराध्यक्ष पदावरून अडले आहे. महाविकास आघाडीतही तीच परिस्थिती आहे. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी आग्रही आहे. याबाबत नुकतीच आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयात अनौपचारिक संयुक्त बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याही बैठकीतही काँग्रेस नगराध्यक्ष पदावर ठाम राहिल्याचे सांगण्यात येत आहे.