राजापूर : पावसाळ्यात शहरातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळ पाटबंधारे विभागातर्फे उपसण्यात आला. मात्र, उपसा केलेला गाळ नदीकाठावर पिचिंग करून ठेवण्यात आला आहे. पिचिंग केलेला हा गाळ पावसाळ्यामध्ये पुन्हा नदीपात्रामध्ये वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.राजापूर शहरातील पुराच्या समस्येवर मात करण्यासाठी राजापूर नगर परिषद प्रशासनाने नाम फाउंडेशन व महसूल प्रशासनाच्या माध्यमातून अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाचे काम हाती घेतले होते. मागील दोन वर्षे लोकसहभागातून अर्जुना व कोदवली नद्यांतील गाळ उपसा करण्यात आला होता. त्यानंतर आमदार किरण सामंत यांनी पुढाकार घेत जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे ५२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून पाटबंधारे विभागातर्फे गाळ उपशाचे काम सुरू आहे.अर्जुना नदीपात्रातील कोंढेतड पूल ते राजीव गांधी क्रीडांगण या दरम्यान ७७,५३५ घनमीटर गाळापैकी १७,८५० घनमीटर, तर कोदवली नदीपात्रातील जवाहरचौक ते गणेश घाट या भागातील ४९,६६५ घनमीटर गाळापैकी २,८५० घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.तीन पोकलेन, तीन डोजर आणि पाच डंपर यांच्या साहाय्याने हा गाळ उपसा करण्यात आला. मात्र, हा गाळ नदीकिनारीच पिचिंग करून ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात हा गाळ पुन्हा नदीत जाण्याचा धाेका आहे. त्यामुळे पुन्हा नदीचे पात्र गाळाने भरण्याची शक्यता आहे.अर्जुना-कोदवली नदीपात्रातील एक लाख २७ हजार २०० घनमीटरपैकी २०,७०० घनमीटर म्हणजे सुमारे १६ टक्के गाळाचा उपसा करण्यात आला आहे.
Ratnagiri: राजापुरात नदीकाठचा गाळ पुन्हा नदीत जाण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:41 IST