Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: ..तर लोकच ठरवतील खरी शिवसेना कोणती, संजय राऊतांचे रोखठोक मत
By मनोज मुळ्ये | Updated: February 17, 2023 14:40 IST2023-02-17T14:39:30+5:302023-02-17T14:40:29+5:30
पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांना अर्धवटच माहिती, आपल्याकडे बरीच माहिती

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: ..तर लोकच ठरवतील खरी शिवसेना कोणती, संजय राऊतांचे रोखठोक मत
रत्नागिरी : सकाळपासून प्रवासात असल्याने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नेमके काय झाले, याची माहिती आपल्याला नाही. मात्र आमची बाजू सत्याची असल्याने आम्ही घाबरत नाही. जर यंत्रणांना निर्णय देण्यात अडचण असेल, त्यांच्यावर दबाव असेल तर त्यांनी निवडणूक लावावी. खरी शिवसेना कोणती, याचा निर्णय लोकच घेतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे न जाता पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडेच राहणार आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, सुनावणीत नेमके काय काय झाले, हे आपल्याला अजून समजलेले नाही. आमची बाजू सत्याची आहे. यंत्रणांवर दबाव असल्यामुळे कदाचित त्यांना निर्णय देण्यात अडचण येत असावी. तसे असेल तर त्यांनी निवडणूक लावावी. खरी शिवसेना कोणती, हे लोकांनाच ठरवू दे. पक्षांतर करणारे ४० आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत, असेही ते म्हणाले.
२०२४ साली देशात, राज्यात राजकीय परिवर्तन होईल. रत्नागिरीत २०२४ ला शिवसेनेचाच आमदार असेल, असे ते म्हणाले. यातील ‘च’ वर आपला जोर असल्याचेही त्यांनी लगेचच सांगितले. महाविकास आघाडी त्यात एकत्रच लढेल, असेही ते म्हणाले.
फडणवीस यांच्यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडे
पहाटेच्या शपथविधीबाबत आपल्याकडे बरीच माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्धवटच माहिती आहे. त्यांच्यापेक्षा आपल्याकडे अधिक माहिती आहे. अर्थात काही सत्य आपल्यासोबतच घेऊन जायची असतात, असे सांगून त्यांनी पुढे भाष्य करणे टाळले.