कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम सुरू, चिपळुणातील तीन गावांचा पाणीपुरवठा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 19:35 IST2025-12-21T19:33:09+5:302025-12-21T19:35:01+5:30
कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम अखेर गुरुवारपासून सुरू झाले, तीन महिने काम चालणार

कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम सुरू, चिपळुणातील तीन गावांचा पाणीपुरवठा ठप्प
चिपळूण : कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम अखेर गुरुवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोनची वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. पुढील तीन महिने कोयना प्रकल्पाचे दोन टप्पे बंद राहणार आहेत. मात्र, त्यामुळे शिरगाव, कोंडफणसवणे व मुंढे या तीन गावच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कोणत्याही प्रकारची लेखी स्वरूपात माहिती न देता कोयना जलविद्युत केंद्र यांनी पाणीपुरवठा बंद केल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.
शिरगाव मुंढे व पोफळी गावांच्या पाणीपुरवठा समस्येवरील पर्यायी व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर १३ डिसेंबर रोजी क्षेत्रीय पूर्व पाहणी करण्यात आली. कोयना बांधकाम विभाग क्रमांक १चे कार्यकारी अभियंता विश्वनाथ सानप यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी झाली. गळती काढण्यासाठी तेथपर्यंत जाणारे पाणी बंद करणे गरजेचे होते. त्यामुळे पाणी अडविण्यासाठी गेट टाकण्यात आले. त्याचा फटका तीन गावच्या पाणीपुरवठ्याला बसला आहे.
याबाबत तिन्ही ठिकाणच्या ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेतली. आमदार शेखर निकम यांनी कार्यकारी अभियंता विश्वनाथ सानप यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोफळी महानिर्मिती कंपनीमध्ये अधीक्षक अभियंता संजय चोपडे यांच्या दालनात अधिकारी व ग्रामस्थांची बैठक झाली.
तीनही गावांना पाणी देण्यात येईल, त्यासाठी दहा लाख लिटर पाणी साठवण करून ठेवले आहे. मात्र, कमी दाबाने पाणी येईल, असे अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सांगितले. गावकऱ्यांना अर्धा तास पाणी मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र बैठक संपल्यावर काही वेळात पाणी बंद झाले.
गळती काढण्याचे काम तीन महिने चालणार आहे. मात्र, जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत काम सुरू करून देणार नसल्याची भूमिका तीन गावांतील नेत्यांनी व ग्रामस्थांनी घेतली असल्याचे समजते.