कोकणात शिवसेना, धनुष्यबाणाचे नाते कधीच तुटू शकत नाही - नीलेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:43 IST2025-06-09T12:43:13+5:302025-06-09T12:43:45+5:30

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश

The relationship between Shiv Sena and Dhanushyabana in Konkan can never be broken says Nilesh Rane | कोकणात शिवसेना, धनुष्यबाणाचे नाते कधीच तुटू शकत नाही - नीलेश राणे 

कोकणात शिवसेना, धनुष्यबाणाचे नाते कधीच तुटू शकत नाही - नीलेश राणे 

चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण वेगळे नाते आहे, ते गावा-गावातून कधीच तुटू शकत नाही. गावातील लोकांना धनुष्यबाण माहीत आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माहीत आहेत. यामुळे लोकं स्वतःहून पक्षात येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून भेट द्यायची आहे, तेव्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी चिपळुणात केले.

चिपळूण दौऱ्यादरम्यान शिंदेसेनेचे चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयात झालेल्या सत्काराप्रसंगी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहाेत. गेली दहा वर्षे आपल्या कपाळाला गुलाल लागला नव्हता. ते तुमच्यामुळे पक्षामुळे लागला, असे आपण आभार दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले हाेते. यामुळे पक्षाचे उपकार आयुष्यात कधीच विसरणार नाही, असे ते म्हणाले. चिपळूणमुळे आपल्याला ओळख मिळाली. ही ओळख गेली दहा वर्षे टिकवण्यामध्ये चिपळूणने मोठे सहकार्य केले, अशा शब्दांत आपली भावना व्यक्त केली.

यावेळी तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, दिलीप चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, माजी नगरसेवक महम्मद फकीर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रश्मी गोखले उपस्थित होते.

कधीही हाक मारा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा. पक्ष मजबूत करा. आपण कडवट शिवसैनिक पदाधिकारी आहात. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी तुमचा भाऊ आहे. तुमच्या कुटुंबातील आहे. मी तुम्हाला आपल्या कुटुंबातील समजतो. मी तुमच्या कुटुंबातील आहे, असे समजून मला कधीही हाक मारा, मी तुमच्या पाठीशी १०० टक्के सदैव उभा असणार आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Web Title: The relationship between Shiv Sena and Dhanushyabana in Konkan can never be broken says Nilesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.