पोस्टाची अत्यंत विश्वसनीय असणारी 'ही' सेवा १७१ वर्षानंतर घेणार निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 18:16 IST2025-08-09T18:14:40+5:302025-08-09T18:16:19+5:30

वेगवान सेवेसाठी स्पीड पोस्टचा ग्राहकांसाठी पर्याय

The postal department has indicated that it will discontinue the 171 year old Registered AD service from September 1 | पोस्टाची अत्यंत विश्वसनीय असणारी 'ही' सेवा १७१ वर्षानंतर घेणार निरोप

संग्रहित छाया

रत्नागिरी : पोस्ट खात्याची ब्रिटिश काळात म्हणजेच १७१ वर्षे सुरू असलेली रजिस्टर्ड एडी ही सेवा १ सप्टेंबरपासून बंद करण्याचे संकेत पोस्ट खात्याने दिले आहेत. याऐवजी आता स्पीड सेवा ही एकच सेवा राहणार असून तिच्या नवीन दराबाबत येत्या आठ दिवसांत वरिष्ठ स्तरावरून कळविले जाणार असल्याची माहिती रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक अनंत सरंगले यांनी दिली. अधिक कार्यक्षम सेवेसाठी हा निर्णय पोस्ट खात्याने घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

ब्रिटिश काळात पोस्टाची सेवा सुरू झाली. अगदी ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचलेल्या पोस्टाने ग्रामीण जनतेशी आपली नाळ आताही कायम ठेवली आहे. सोशल मीडियाचे प्रस्थ वाढल्याने पोस्टाच्या तारसेवा, आंतर्देशीय पत्रे, साधे पोस्टकार्ड या सेवा बंद पडल्या. त्यांचा वापर अत्यंत कमी झाला. रजिस्टर्ड एडी ही सेवा मात्र आजही लोकप्रियता टिकवून आहे. या सेवेत टपाल पोहोचल्यानंतर घेणाऱ्याच्या सहीसह पोहोचदेखील मिळते. त्यामुळे रजिस्टर्ड एडी ही सेवा अत्यंत विश्वसनीय मानली जाते. शासकीय कार्यालयांमध्ये अजूनही या सेवेचा वापर होत आहे.

बदलत्या काळानुसार आता पोस्टही हायटेक झाले आहे. आता तर बॅंकिग क्षेत्रातही पोस्टाने पदार्पण केले आहे. त्यामुळे वेगवान असलेल्या स्पीड पोस्टचा पर्याय स्वीकारून रजिस्टर्ड एडी ही सेवा दीर्घ काळानंतर पोस्टाने बंद करण्याच्या निर्णय घेतला असल्याचे डाकघर अधीक्षक सरंगले यांनी सांगितले.

स्पीड पोस्ट सेवेत ३५ किलो वजनापर्यंतचे पार्सल पाठविण्याची सोय आहे. टपाल पोहोचल्यानंतर मिळणारी पोहोच ही रजिस्टर्ड टपालाची सुविधा आता स्पीड पोस्टलाही दिली जाणार आहे. रजिस्टर्ड एडीपेक्षाही स्पीड पोस्ट सेवा वेगवान असल्याने ही सेवा बंद करून स्पीड पाेस्ट सेवा सुरू ठेवली जाणार आहे. मात्र, १७१ वर्षांची ही सेवा लोकप्रिय असतानाच बंद होणार आहे.

ट्रॅकिंगसाठी स्पीड पोस्ट

अधिक कार्यक्षम सेवेसाठी रजिस्टर सेवा बंद करून स्पीड पोस्ट सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे पोस्टाकडून सांगितले जात आहे. स्पीड पोस्टद्वारे ग्राहकाला कमीत कमी वेळेत पार्सल पोहोचवता येणार आहे. टपाल पोहोचलेल्या ठिकाणाचे ‘ट्रॅकिंग’ही करता येणार आहे. रजिस्टर्ड टपाल सेवा ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने ही सेवा ३० ऑगस्टपासून १७१ वर्षानंतर ग्राहकांचा निरोप घेणार आहे.

Web Title: The postal department has indicated that it will discontinue the 171 year old Registered AD service from September 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.