चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामातील विघ्न संपेना, वाढीव पुलाचा प्रश्न प्रलंबितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 19:13 IST2025-08-06T19:13:41+5:302025-08-06T19:13:57+5:30

सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर, आता जानेवारी २०२६चा काढला मुहूर्त

The hurdles in the work of the flyover in Chiplun are not over the issue of the extended bridge is still pending. | चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामातील विघ्न संपेना, वाढीव पुलाचा प्रश्न प्रलंबितच

चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामातील विघ्न संपेना, वाढीव पुलाचा प्रश्न प्रलंबितच

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेख येथील उड्डाणपूल तब्बल पाच वर्षे रखडला असून, आता त्यासाठी जानेवारी २०२६चा मुहूर्त काढण्यात आला आहे. मात्र, या कामातील विघ्न संपता संपेना, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. पुलाचे काम सुरू झाल्यापासून सातत्याने अडचणी येतच आहेत. 

दोन वर्षांपूर्वी या पुलाचे गर्डर कोसळले, तर गतवर्षी पिअर कटिंग सुरू असतानाच पिअर कॅपचा एक भाग व क्रेनचा रोप तुटून दोन कामगार जखमी झाले होते. सोमवारी याच उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातावर लोखंडी सळी पडून किरकोळ जखमी झाला. त्यामुळे ठेकेदार कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील बहुतांशी काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, चिपळूण शहरातील वाहतुकीच्या सोयीसाठी बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी १,८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी असून, हा पूल कोकणातील महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा ठरणार आहे. या पुलासाठी सुरुवातीला ४६ पिलर उभारण्यात आले होते. बहादूरशेख नाका येथून या पुलाचे काम सप्टेंबर २०२० मध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात केली. मात्र, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या कामातील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या.

समितीने सुचवल्या सुधारणा

पूर्ण होण्याआधीच पुलाचा काही भाग कोसळल्याने तातडीने केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली होती. समितीच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या डिझाईनमध्येच बदल सुचवले. सुरुवातीला पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले होते. त्यामधील अंतर कमी करून ते आता २० मीटरवर ठेवले आहे. त्यासाठी तेथे अजूनही अतिरिक्त पिअर उभारले जात आहेत.

आणखी पाच महिने प्रतीक्षा

  • नवीन रचनेनुसार या उड्डाणपुलाचे काम सुरू असून, पिअर कॅप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आता बहुतांशी पिअर कॅपचे काम पूर्ण होत आले आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत.
  • एकाचवेळी पिअर कॅप उभारणे, पिअर कॅपवर गर्डर चढविणे व काही ठिकाणी स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी दोन क्रेन मागविण्यात आले असून, त्याआधारे महिनाभरात २०० हून अधिक गर्डर चढविण्यात आले.
  • अजूनही उर्वरित कामासाठी किमान पाच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने जानेवारी २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात येत आहे.


वरवरच्या उपाययोजना

आतापर्यंत उड्डाणपुलाच्या कामात छोटे-मोठे अपघात घडले. परंतु तरीही ते फारसे गांभीर्याने घेण्यात आले नाही. त्या-त्या वेळी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या. सोमवारी विद्यार्थी जखमी झाल्यानंतर कामाच्या ठिकाणी उपाययोजना म्हणून सुरक्षा रक्षक नेमले आहेत. तसेच त्यांची संयुक्त बैठक घेऊन आली. त्यानंतर आता ८ रोजी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या उपस्थितीत महामार्ग व ठेकेदार यांच्यात बैठक होणार आहे.

वाढीव पुलाचीही प्रतीक्षा

मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण हद्दीतील पाग पॉवरहाऊस येथे असलेल्या चौकातून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. आतापर्यंत येथे अनेक अपघात झाले असून, त्यात काहींना आपले प्राणही गमवावे लागले. सततच्या अपघाताच्या घटनांमुळे हा चौक भविष्यात ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: The hurdles in the work of the flyover in Chiplun are not over the issue of the extended bridge is still pending.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.