चिपळुणातील उड्डाणपुलाचा जानेवारीचाही मुहूर्त हुकणार, तब्बल पाच वर्षे पुलाचे काम रखडलेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:25 IST2025-10-27T18:23:50+5:302025-10-27T18:25:17+5:30
वाढीव पुलाची प्रतीक्षा कायम

चिपळुणातील उड्डाणपुलाचा जानेवारीचाही मुहूर्त हुकणार, तब्बल पाच वर्षे पुलाचे काम रखडलेले
चिपळूण : मुंबई-गोवामहामार्गावरील चिपळूण शहरातील बहादूरशेख येथील उड्डाणपूल तब्बल पाच वर्षे रखडला आहे. हा पूल जानेवारी २०२६ मध्ये वाहतुकीसाठी खुला हाेईल, असे सांगण्यात आले हाेते. मात्र, आतापर्यंत ७३.५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम तितकेच अवघड आहे. त्यामुळे जानेवारीचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.
महामार्गाच्या पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील बहुतांशी काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र, चिपळुणातील वाहतुकीच्या सोयीच्या दृष्टीने बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. बहादूरशेख नाका येथून या पुलाचे काम सप्टेंबर २०२० मध्ये सुरू झाले. मात्र, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या कामातील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या.
त्यानंतर नवीन रचनेनुसार या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. बहुतांशी पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत. आता एकाचवेळी पिअर कॅपवर गर्डर चढविणे व काही ठिकाणी स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी दोन क्रेन कार्यरत असून, त्याआधारे ७२८ पैकी २२२ गर्डर चढविण्याचे काम पूर्ण झाले आहे. दररोज चार ते सहा गर्डर चढविण्यात येत आहेत. मात्र, अजूनही उर्वरित कामासाठी किमान पाच महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने जानेवारी २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होणे कठीण बनले आहे.
वाढीव पुलाची प्रतीक्षा कायम
चिपळूण हद्दीतील पाग पाॅवर हाऊस येथे असलेल्या चौकातून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. आतापर्यंत येथे अनेक अपघात झाले आहेत. सततच्या अपघाताच्या घटनांमुळे हा चौक भविष्यात ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जाण्याची भीती व्यक्त हाेत आहे. त्यासाठी उड्डाणपुलाच्या वाढीव कामाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही.