Ratnagiri: बिकट घाट; परशुराम घाटातील खचलेले काँक्रिटीकरण ‘जैसे थे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:49 IST2025-01-22T18:36:34+5:302025-01-22T18:49:34+5:30
संदीप बांद्रे चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीवर उपाययोजना म्हणून गॅबियन वॉल व दरडीसाठी लोखंडी जाळ्या ...

Ratnagiri: बिकट घाट; परशुराम घाटातील खचलेले काँक्रिटीकरण ‘जैसे थे’
संदीप बांद्रे
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीवर उपाययोजना म्हणून गॅबियन वॉल व दरडीसाठी लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, याच घाटात अनेक ठिकाणी चौपदरीकरणांतर्गत केलेला काॅंक्रीटचा रस्ता खचला असून, काही ठिकाणी तडेही गेले आहेत. या धाेकादायक रस्त्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास घाटातील धाेका वाढण्याची भीती आहे.
परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतले आहे. पावसाळ्यापूर्वी घाटातील धोकादायक असलेल्या ठिकाणी काॅंक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले होते. तसेच काही ठिकाणी रस्ताही खचला होता. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू असतानाच दोन महिन्यांपूर्वी अचानक रस्त्याचा मोठा भाग खचला आणि त्या ठिकाणची संरक्षक भिंतही कोसळली. तेव्हापासून आजतागायत परशुराम घाटात एकेरी वाहतूक केली जात आहे.
खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी गॅबियन वॉल उभारली जात आहे. त्यासाठी पायथ्यालगत डबर व सिमेंटच्या आधारे मजबुतीकरण केले जात आहे. या कामासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. याच पद्धतीने दरडीच्या बाजूने ८ ड्रीलच्या साहाय्याने लोखंडी रॉड खडकामध्ये बसवून त्यावर जाळी टाकण्याचे काम सुरू केले आहे. एकीकडे ही दोन्ही कामे सुरू असताना खचलेल्या काॅंक्रिटीकरणाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे.
खचलेल्या काॅंक्रिटीकरणाच्या ठिकाणी वेळीच उपाययोजना न झाल्यास त्याखालील गॅबियन वॉलवर पुन्हा ताण येऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी खचलेल्या काॅंक्रिटीकरणावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
परशुराम घाटातील खचलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी गॅबियन वॉल उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच दरड कोसळू नये यासाठी लोखंडी जाळी बसवली जात आहे. ही दोन्ही कामे मार्गी लागल्यावर खचलेल्या काॅंक्रिटीकरणाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. - पंकज गोसावी, राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग विभाग.