Ratnagiri: वालोपेतील डोंगरावर भीषण वणवा, विभागीय वनअधिकारी मध्यरात्री घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:10 IST2025-02-12T18:09:44+5:302025-02-12T18:10:23+5:30
जैवविविधता नष्ट

Ratnagiri: वालोपेतील डोंगरावर भीषण वणवा, विभागीय वनअधिकारी मध्यरात्री घटनास्थळी
चिपळूण : तालुक्यातील वालोपे पायरवाडी येथील डोंगरावर लागलेल्या वणव्यात जैवविविधता नष्ट झाली आहे. ही घटना साेमवारी रात्री घडली. या वणव्याची माहिती मिळताच विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी रात्रीच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत आग आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या वणव्यामुळे चिपळूणमधील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
वालोपे या भागात वणवा लागल्याचे कळताच उद्धवसेनेचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी तत्काळ वन विभागाचे परिक्षेत्रीय वनअधिकारी सरवर खान यांना माहिती दिली. त्यानंतर विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सहकारी आणि युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, युवासेना सचिव अनिकेत शिंदे, उपतालुकाप्रमुख आदित्य शिंदे, आदित्य पेडणेकर, ओंकार नलावडे यांच्या मदतीने आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
कोणीतरी जाणीवपूर्वक हा वणवा लावलेला आहे. या वणव्यामुळे निसर्गाचे व पर्यावरणाचे नुकसान होतेच होते; परंतु, जंगलातील झाडे, प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक हे जळून जातात. तेव्हा स्थानिक ग्रामस्थांनी याविषयी कायम जागरूक राहण्याची गरज आहे. - बाळा कदम, क्षेत्रप्रमुख, उद्धवसेना.