Ratnagiri: खेडमध्ये गोवंशीय हत्येवरुन तणाव; पोलिस बंदोबस्त तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:31 IST2024-12-23T16:20:03+5:302024-12-23T16:31:07+5:30

घटनास्थळी जमाव जमलेला असताना एका रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने जमावाला उद्देशून अपशब्द वापरला. त्यामुळे संतप्त जमावाने रिक्षा अडवली

Tension over cow slaughter in Khed; Police deployed | Ratnagiri: खेडमध्ये गोवंशीय हत्येवरुन तणाव; पोलिस बंदोबस्त तैनात

Ratnagiri: खेडमध्ये गोवंशीय हत्येवरुन तणाव; पोलिस बंदोबस्त तैनात

खेड : तालुक्यातील खेड शहर ते खारी मार्गावर असलेल्या नवीन देवणे पुलाखाली गोवंशाचे अवयव सापडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्यादरम्यान उघडकीला आली असून, या प्रकारानंतर खेडमध्ये पाेलिसांचा बंदाेबस्त वाढविण्यात आला आहे.

देवणे पूल परिसरात खाडी मार्गावर गोवंश अवयव सापडल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची जादा कुमक घेऊन घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून सर्व अवयव ताब्यात घेतले आहेत. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी संशयित समाजकंटकांना अटक करण्याची मागणी करत रास्ता रोको केला. यावेळी शिंदेसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, महेंद्र भोसले, खारी नांदगाव ग्रामपंचायत सरपंच राजेश पालकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले हाेते.

यावेळी माध्यमांसोबत बोलताना सचिन धाडवे यांनी सांगितले की, ही घटना निंदनीय असून, पोलिसांनी उद्या सायंकाळपर्यंत समाजकंटकांना अटक करण्यासाठी आम्ही अवधी देत आहाेत. त्यानंतर आम्ही स्वतः त्यांना शोधू, असा इशारा दिला आहे.

रिक्षाचालकाला दम

घटनास्थळी जमाव जमलेला असताना याच रस्त्यावरून एका रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने जमावाला उद्देशून अपशब्द वापरला. त्यामुळे संतप्त जमावाने ती रिक्षा अडवली. परंतु, त्या रिक्षात प्रवाशांसोबत दोन लहान मुले असल्याने पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर ही रिक्षा जमावाने सोडून दिली. परंतु, जमावाने रिक्षाची मागील बाजूची काच फोडून टाकली.

माझी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व स्थानिक पोलिस निरीक्षकांशी चर्चा झाली आहे. संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घ्या व याप्रकरणी कसून चौकशी करा, असे आदेश दिले आहेत. या विषयाशी निगडित असलेल्या कुणाचीही गय करण्यात येणार नाही. - योगेश कदम, राज्यमंत्री गृह (शहर)

Web Title: Tension over cow slaughter in Khed; Police deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.