महामार्गावर लांजात टेम्पाे उलटला, चालकासह क्लिनर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 17:55 IST2023-09-08T17:54:44+5:302023-09-08T17:55:28+5:30
अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली हाेती

महामार्गावर लांजात टेम्पाे उलटला, चालकासह क्लिनर जखमी
लांजा : तीव्र उतारावरील वळणावर वाहनावरील ताबा सुटून आयशर टेम्पाे उलटून अपघात झाल्याची घटना गुरुवारी (७ सप्टेंबर) सकाळी ६:३० वाजता मुंबई-गाेवा महामार्गावरील आंजणारी (ता. लांजा) येथे घडली. या अपघातात चालक रफिक बादशहा लतिफ आणि क्लिनर सत्यवान संजीव माेरे हे दाेघे जखमी झाले आहेत.
रफिक बादशहा लतिफ हा आयशर टेम्पो (जीए ०४, टी ६५६८) प्लास्टिकचे बॅरल घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात हाेता. आंजणारी घाट उतरून काजळी नदीवरील पूल ओलांडण्यापूर्वीच वळणावर टेम्पाे उलटला. अपघातानंतर टेम्पो चालक रफिक लतिक केबीनमध्येचे अडकून पडला होता. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली हाेती.
अपघाताची माहिती मिळतात लांजा पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने टेम्पोमध्ये अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. चालक रफिक लतिक याच्यासह क्लिनर सत्यवान संजीव मोरे हा किरकोळ जखमी झाला. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.