काेविड - १९च्या संसर्गात मुलांचे आराेग्य जपण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:26 AM2021-07-25T04:26:16+5:302021-07-25T04:26:16+5:30

या काळात अंगणवाडी ते पुढे या शालेय गटांना घरातच राहून शिक्षण घ्यावे लागते. पर्याय नाही. त्यामुळे घर हीच शाळा ...

To take care of the health of children infected with Cavid-19 | काेविड - १९च्या संसर्गात मुलांचे आराेग्य जपण्यासाठी

काेविड - १९च्या संसर्गात मुलांचे आराेग्य जपण्यासाठी

Next

या काळात अंगणवाडी ते पुढे या शालेय गटांना घरातच राहून शिक्षण घ्यावे लागते. पर्याय नाही. त्यामुळे घर हीच शाळा ठरते. शिक्षण ऑनलाईन झाले आहे. त्याचा परिणाम नक्की मुलांच्या वर्तणुकीवर, डोळ्यांवर, मेंदूच्या आकलन शक्तीवर, लिहिण्याच्या पद्धतीवर झाला आहे. त्यात शिकताशिकता मुलं स्क्रिनवर जास्तच रेंगाळतात. त्याचा परिणामही डोळ्यांवर होत आहे. डोळे शुष्क होणे, दूरचे दिसण्याचा नंबर किंवा जवळचे बघण्याचा नंबर वाढणे, लठ्ठपणा वाढणे, खादाडपणा वाढणे, एकलकोंडे होणे, चिडचिडेपणा वाढणे, शारीरिक हालचाली कमी होणे या गोष्टी अपरिहार्यपणे येतातच. अलीकडेच एक संशोधन आणि अभ्यास आला आहे. दोन तासांपेक्षा ज्या मुलांचा स्क्रिनटाईम जास्त आहे, त्यांच्या मेंदूत विशेषत: मेेंदूतला कॉटेक्स स्तर पातळ होतो. ते आवरण मेंदूच्या बाहेरचे असते. मात्र, त्याचा संबंध आकलनाशी आणि त्याच्या विकासाशी असतो. त्यात पुन्हा शाळेत सवंगडी भेटतात. सर्वांशी संबंध येतो. इथे तो संबंध तुटला आहे. सामूहिकतेलाच ‘ब्रेक’ बसला आहे. संसर्ग काळाच्या ज्या मर्यादा आहेत, त्या मुलांच्या संसर्गापासून सुरक्षितता यासाठी पाळायलाच हव्यात. त्याचवेळेस मुले एका अनामिक भीतीच्या सावलीतही असतात. कारण बाहेर न जाण्याची बंधने आहेत. पालकही ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरातच असतात. अशावेळी मुलांना मानसिक शांती, आधार इत्यादी देता येणं हे आवश्यकच असतं. स्क्रिन टाईमचाही त्यांच्या मनावर परिणाम होऊ नये, यासाठी काही गोष्टी आवश्यक ठरतात. ग्रामीण भागात जिथे बिलवुड संसर्ग नाही, अर्थात परिस्थिती अशी आहे की संसर्ग होणार नाही, याची खात्री देता येत नाही. आपण त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी काही गोष्टी आवर्जून करु शकतो. १) जर ऑनलाईन वर्ग असतील तर प्रत्येक पिरीअडनंतर दहा मिनिटांचा ब्रेक द्यावा. यात पालकांनी जो होम वर्क किंवा लो स्क्रिन याची दक्षता घ्यावी. इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्यात. त्यावेळी ‘स्क्रिन बंद’ ही मोहीम राबवावी. शाळेच्या व्यवस्थापनासोबत चर्चा करुन या निर्णयावर यावेच यावे. त्यावेळेस ‘वर्क फ्रॉम होम’च्या धबडग्याखाली जर पालक असतील तर त्यांनी आपल्या व्यवस्थापनाकडे तशी विनंती करुन सूट मागून घ्यावी. ती नक्की मिळेल. अर्थात अर्जंट मिटींग असेल तर गोष्ट वेगळी. ती समजून घ्यावी.

२) घरी असलं की भूक वाढते. कारण किचन सदैव सुरु असतं. अशावेळेस पॅक फूड, तेलकट पदार्थ टाळावेत. किचन हा एक कारखाना आहे. मध्ये मध्ये हलकेफुलके खाणे करावे. मुलं ते आवडीने खातात. कॅलरीज वाढत नाहीत. ३) शक्य असल्यास फळे महाग असली तरीही ती खाण्यासाठी मुले कां कू करतात. त्यांना त्याची सवय लावावी, तसा प्रयत्न हमखास यशस्वी होतो. ४) भरपूर पाणी पिण्यास उद्युक्त करावे. मुलं पाणी पित नसल्यास साधे सरबतसारखे पेय द्यावे. अर्थात घरगुती उदा. कोकम, लिंबू सरबत इत्यादी. त्यातूनही भरपूर पाणी मिळेल. ५) स्वाध्याय घेताना मुले चिडचिड करतात. त्यामुळे थांबून थांबून तो करुन घ्यावा. ६) आई, वडील पुस्तके, वर्तमानपत्रे वाचतील, तर तेही वाचतील. त्यांना वाचून दाखवावे. लहान लहान गोष्टींची पुस्तके वाचून दाखवावीत. गोष्टी सांगाव्यात. पालकांनी मात्र त्यावेळी मोबाईल दूर ठेवावा. टीव्ही त्यावेळेस बाजूला ठेवावा. ७) काही खेळ जे घरच्या घरी खेळता येतात, तळ्यात - मळ्यात, गोड गोड पाणी - इत्ता इत्ता राणीसारखे खेळ द्यावेत. जेणेकरुन त्यांचा व्यायाम होईल. ८) मी माझ्या एका लेखात ‘झुम्बा’ची संकल्पना सांगितली होती. मुले ती आनंदाने करतात, वाचतात. ९) एखादा टी. व्ही.वरचा सामूहिक कार्यक्रम बघावा. १०) क्राफ्टवर्क , पेपरवर्क , ड्रॉईंग वर्क हे फावल्या वेळेत द्यावे. ११) काही बैठे खेळपण खेळता येतील, तेही द्यावेत. १२) महत्त्वाचे म्हणजे पालकांनी पाल्यांच्या पुढे भांडू नये. कारण बंदीस्तपणामुळे त्यांच्यावरही काही दडपण येतंच. त्याचा राग मुलांवर निघू नये. १३) साधारण एक वर्ष ह्या सर्व सूचना प्रत्यक्ष अंमलात आणाव्यात, कारण कुठलंही संसर्गाचं सावट यावर मानवीय संशोधन मात करतेच. मग काय वातावरण मोकळं होईल. म्हणून घर जपा, आपली मुलं जपा, कारण तीच आपली धरोहर आहे, म्हणून त्यांना आपली मायेची ऊब या काळात अनुभवू द्या. स्वत: खुश रहा, त्यांना खुश ठेवा, कारण त्याचा परिणाम आपल्या मनावरही चांगलाच होतो. ती ही एक थेरपी आहे.

- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी

Web Title: To take care of the health of children infected with Cavid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.