Ratnagiri: समुद्रात एक संशयास्पद बार्ज दिसली, सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:07 IST2025-06-06T12:06:31+5:302025-06-06T12:07:01+5:30

फिनोलेक्स जेटीसमोरील समुद्रात एक संशयास्पद बार्ज, टग आणि होडी दिसली

Suspicious barge, boat spotted in sea in front of Finolex Jetty in Ratnagiri Security agencies in a state of panic | Ratnagiri: समुद्रात एक संशयास्पद बार्ज दिसली, सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली

Ratnagiri: समुद्रात एक संशयास्पद बार्ज दिसली, सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली

रत्नागिरी : भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर फिनोलेक्स जेटीसमोरील समुद्रात एक संशयास्पद बार्ज, टग आणि होडी दिसली आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. परंतु, या बोटीचा मालक मुंबईतील असून, बोटीची बॅटरी डिस्चार्ज झाल्याने इंजिन बंद पडले असल्याची माहिती पुढे आली आणि सर्वांनी नि:श्वास सोडला.

बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फिनोलेक्स कंपनीच्या कार्यालयातून पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाला याबाबत माहिती देण्यात आली. फिनोलेक्स जेटीसमोर एका अनोळखी बार्जसह एक टग बोट व एक छोटी होडी रनपार दिशेने जात असल्याचे स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी शिट्टी वाजवून इशारा दिला असता, संबंधित बोटीवरील व्यक्तींनी कोणतीही प्रतिक्रिया न देता पुढे सरकत समुद्रकिनारी रनपारनजीक अँकर टाकून बोट उभी केली.

सदर घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिस स्थानकाचे अंमलदार घटनास्थळी पोहोचले. दुर्बिणीद्वारे पाहणी केल्यानंतर, बार्जवर ५ ते ६ अनोळखी इसम उपस्थित असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या व्यक्तींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

ही बाब पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, सुरक्षा शाखा रत्नागिरी, कस्टम अधिकारी गायकवाड, पोर्ट डिपार्टमेंट व कोस्टगार्ड यांना तातडीने कळविण्यात आली. पोलिस अधीक्षकांनी १/३ शस्त्रधारी गार्ड समुद्रकिनारी तैनात करण्याचे आदेश दिले. यानुसार पोलिसांनी तत्काळ गार्ड नेमले व सतत पेट्रोलिंग सुरू केले.

दरम्यान, कोस्ट गार्डच्या पल्लवी काळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही घटना सांगण्यात आली. त्यांनी कोस्ट गार्डची बोट घटनास्थळी पाठविण्याचे आश्वासन दिले. मात्र, रात्री ८ वाजता हवामान खराब असल्याने बोट पोहोचण्यात अडथळा येत असल्याचे त्यांनी कळविले. कोस्ट गार्डची बोट ५ जूनला सकाळी ८ वाजेपर्यंत फिनोलेक्स जेटीवर पोहोचेल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, पोलिसांचा बोटमालकाशी संपर्क झाल्याने बोटीची बॅटरी डिस्चार्ज होऊन इंजिन बंद पडल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

Web Title: Suspicious barge, boat spotted in sea in front of Finolex Jetty in Ratnagiri Security agencies in a state of panic