सामंत यांना धमकी देणाऱ्याला समर्थकांनी चोपले, केलं होतं असं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 14:13 IST2022-09-12T14:12:11+5:302022-09-12T14:13:23+5:30
हा विषय समजताच राजापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही लोकांना ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

सामंत यांना धमकी देणाऱ्याला समर्थकांनी चोपले, केलं होतं असं भाष्य
विनोद पवार -
राजापूर : उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी देणाऱ्या नरेंद्र जोशी यांना सोमवारी राजापूर न्यायालयाच्या आवारातच काही लोकांनी चोपले. रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नरेंद्र जोशी यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत मंत्री सामंत यांना जाळून टाकू, अशी धमकी दिली होती.
सोमवारी ते आपल्या कामासाठी राजापूर न्यायालयात आले होते. ही बाब समजल्यानंतर काही सामंत समर्थक तेथे गेले आणि त्यांनी जोशी यांना चोप दिला, असे समजते. हा विषय समजताच राजापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही लोकांना ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
काय म्हणाले होते जोशी -
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी राजापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात जोशी नामक रिफायनरी विरोधकाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टिका केली. कोणतरी मंत्री सांगतोय, कोण तरी कंपनी आणून टाकतोय, असे सांगून मंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारु, असे खळबळजनक विधान जोशी यांनी केले होते. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.