दापाेलीत ५० हजारांची लाच घेताना उपकार्यकारी अभियंता जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 16:03 IST2023-03-10T15:43:14+5:302023-03-10T16:03:27+5:30
वीजभार व वीज राेहित्र बसविण्याच्या कामाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देऊन तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी मागितली लाच

दापाेलीत ५० हजारांची लाच घेताना उपकार्यकारी अभियंता जाळ्यात
दापोली : वीजभार व वीज राेहित्र बसविण्याच्या कामाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देऊन तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना दापाेलीच्या उपकार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी (दि.९) करण्यात आली. अमाेल मनाेहर विंचूरकर असे उपकार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
अमाेल विंचूरकर मूळचा नागपूर येथील राहणारा असून, ताे महावितरणच्या दापाेली उपविभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. दापाेली उपविभागातील इलेक्ट्रिक ठेकेदारांच्या पक्षकाराकडे ११० केव्हीए वीजभार व वीज रोहित्र बसविण्यात येणार आहे. या कामाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देऊन तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी अमाेल विंचूरकर याने ८० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील ५० हजार रुपये लगेच देण्याची मागणी केली.
त्यानुसार कार्यालयाबाहेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला हाेता. ही रक्कम ठेकेदाराकडून घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अभियंता अमोल विंचूरकर याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई पाेलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक अनंत कांबळे, पोलिस हवालदार विशाल नलावडे, पोलिस शिपाई हेमंत पवार, प्रशांत कांबळे यांनी केली.
तक्रारदार यांचे कुठलेही काम संबंधित कार्यालयात अडवले जाणार नाही, याची शाश्वती त्यांना देण्यात आली आहे. त्यांचे काम आम्ही तत्काळ करून घेत आहाेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.