छत्रपतींसह कुसुमाग्रजांबाबत नेहरू विद्यापीठात अध्ययन केंद्र - मंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:31 IST2025-02-27T18:30:09+5:302025-02-27T18:31:04+5:30

भाषेमुळेच वेगळी ओळख

Study Center at Nehru University on Chhatrapati Shivaji Maharaj and Kusumagraj says Minister Uday Samant | छत्रपतींसह कुसुमाग्रजांबाबत नेहरू विद्यापीठात अध्ययन केंद्र - मंत्री उदय सामंत

छत्रपतींसह कुसुमाग्रजांबाबत नेहरू विद्यापीठात अध्ययन केंद्र - मंत्री उदय सामंत

चिपळूण : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आता जागतिक स्तरावर मराठी भाषेचे महत्त्व वाढले आहे. मराठीबरोबरच प्राकृतला देखील महत्त्व आले आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी कुसुमाग्रज यांचे अध्ययन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याबाबत आपण तेथील विद्यापीठाशी संपर्क साधल्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी चिपळुणात सांगितले. तसेच मराठी भाषा आणखी मोठी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चिपळूणवर माझे रत्नागिरी एवढेच प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही विकासासाठी निधी कमी पडणार नाही. मराठी भाषेबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी तयार केलेले रत्नाक्षरे हे पुस्तक राज्यात आदर्श ठरावे असे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सामंत यांच्या हस्ते अनेक कामांचे भूमिपूजन, उद्घाटन करून मुख्याधिकारी भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रत्नाक्षरे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, अरुण इंगवले, ज्येष्ठ कवी राष्ट्रपाल सावंत, प्रशांत पटवर्धन, मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर उपस्थित होते. 

भाषेमुळेच वेगळी ओळख

मराठी बोलण्यात कोणताही कमीपणा नाही. मी परदेशातही मराठीत बोलतो, तरीही हजारो कोटींची गुंतवणूक राज्यात आणली आहे. मराठी माणसाला मराठी भाषेनेच वेगळी ओळख दिली आहे. त्यामुळे या भाषेवर अन्याय होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Web Title: Study Center at Nehru University on Chhatrapati Shivaji Maharaj and Kusumagraj says Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.