चिपळूणची ‘लालपरी’ चार दिवसांनी पश्चिम महाराष्ट्रात, मराठा आंदोलनामुळे वाहतूक होती ठप्प

By संदीप बांद्रे | Published: November 4, 2023 06:55 PM2023-11-04T18:55:30+5:302023-11-04T18:56:57+5:30

आगाराचे लाखोंचे नुकसान

ST bus service canceled due to Maratha agitation will resume from Chiplun Agar | चिपळूणची ‘लालपरी’ चार दिवसांनी पश्चिम महाराष्ट्रात, मराठा आंदोलनामुळे वाहतूक होती ठप्प

चिपळूणची ‘लालपरी’ चार दिवसांनी पश्चिम महाराष्ट्रात, मराठा आंदोलनामुळे वाहतूक होती ठप्प

चिपळूण : मराठा आरक्षणाच्या मुद्दयांवरून चिघळलेल्या आंदोलनामुळे चिपळूण आगारातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारी बस वाहतूक रद्द करण्यात आली होती. दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांनी गुरूवारी उपोषण स्थगित केल्यानंतर ठिकठिकाणचे तणावपूर्ण वातावरण शांत झाले आहे. त्यामुळे रद्द केलेली बससेवा शुक्रवारपासून सुरळीत करण्यात आली आहे. वाहतूक सेवा सुरू झाल्याने तब्बल चार दिवसांनी चिपळुणातून पश्चिम महाराष्ट्रात लालपरी धावली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपाेषण सुरू हाेते. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनामुळे एसटीची तोडफोड, दगडफेक होऊन नुकसान होऊ नये यासाठी सोमवारपासून चिपळूण आगारातून सुटणाऱ्या अक्कलकोट, बीड, बेळगाव या मार्गावरच्या पाच फेऱ्या बंद केल्या होत्या. तर मंगळवारीही या फेऱ्यांबरोबरच पुणे, मिरज, सातारा, कराड, कवठेमहाकांळ, जत आदी १० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. चार दिवस या बस फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे २,८६० किलोमीटरचे मार्ग कमी झाले. परिणामी, चिपळूण आगाराला मोठा आर्थिक फटका बसला.

पोफळीच्या पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटी बसेस बंद झाल्याने प्रवासीही खोळंबले. या मार्गावर प्रवास करणारे अनेक प्रवासी चिपळुणात अडकून होते. त्यांना खासगी वाहनांच्या आधारे प्रवास करावा लागला. शुक्रवारपासून या बंद असलेल्या सर्व फेऱ्या पूर्ववत करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी दिली.

Web Title: ST bus service canceled due to Maratha agitation will resume from Chiplun Agar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.