हरणाच्या शिंगांची तस्करी, मंडणगडात दोघांना पाठलाग करुन पकडले
By अरुण आडिवरेकर | Updated: July 21, 2023 18:57 IST2023-07-21T18:57:04+5:302023-07-21T18:57:20+5:30
मंडणगड : खासगी गाडीतून हरणाच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या दाेघांना बाणकाेट सागरी पाेलिस स्थानक आणि मंडणगड पाेलिसांच्या पथकाने थरारक पाठलाग ...

हरणाच्या शिंगांची तस्करी, मंडणगडात दोघांना पाठलाग करुन पकडले
मंडणगड : खासगी गाडीतून हरणाच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या दाेघांना बाणकाेट सागरी पाेलिस स्थानक आणि मंडणगड पाेलिसांच्या पथकाने थरारक पाठलाग करत पकडले. त्यांच्याकडून शिंगे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई १९ जुलै २०२३ रोजी दुपारी ४:३५ वाजता करण्यात आली. राहुल दिलीप भोसले (२४, रा. नवानगर पिंपळवाडी - तिसंगी, ता. खेड) व विनिता फिलीफ केसकर (५३, रा. एकवीरा नगर - कुंभारवाडा, ता. खेड) अशी दाेघांची नावे आहेत.
गस्त घालत असताना वन्यजीव प्राण्याच्या अवयवाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पाेलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने बाणकोट पोलिसांनी देव्हारे येथे तात्काळ नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरु केली. दरम्यान, संशयित गाडी येताना दिसताच पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनकाचालकाने पोलिसांना हुलकावणी देत नाकांबदीतून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला.
अखेर पोलिस निरीक्षक शैलजा सावंत यांनी मंडणगड तहसील कार्यालयासमोर नाकाबंदी केली. याठिकाणी ही गाडी थांबवून राहुल दिलीप भोसले आणि विनिता फिलीफ केसकर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी गाडीतून फेकून दिलेली पिशवी व त्यातील हरणाची दोन शिंगे पोलिसांनी ताब्यात घेतली.
या दोघांचे विरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९(१), ४४, ४९, ५१, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्विप्ट डिझायर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. याबाबत सहायक पोलिस फौजदार नारायण आळे यांनी फिर्याद दिली आहे. बाणकोट पोलिस अधिक तपास करत असून, दाेघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले आहे.