रत्नागिरीत तस्करी करणारी बोट जप्त, १६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 17:47 IST2023-04-24T17:47:01+5:302023-04-24T17:47:15+5:30
प्राण्यांची तस्करी करून गुजरातकडे नेण्यात येत हाेते

रत्नागिरीत तस्करी करणारी बोट जप्त, १६ जणांना अटक
रत्नागिरी : शेळ्या, मेंढ्यांची तस्करी करणाऱ्या बाेटीवर बाणकाेट (ता. मंडणगड) किनारपट्टीपासून ७५ नाॅटिकल मैल अंतरावर सीमाशुल्क विभागाच्या पथकाकडून शुक्रवारी (२१ एप्रिल) राेजी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान कारवाई करण्यात आली. या बाेटीत ४ हजार शेळ्या मेंढ्या आढळल्या असून, याप्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली. ही बाेट सिंधुदुर्गातून गुजरातकडे जात हाेती.
शेळ्या, मेंढ्यांनी भरलेली बाेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग जेट्टीवरून गुरुवारी सकाळी निघणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली हाेती. त्यानुसार सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बाेटीचा पाठलाग सुरू केला. मात्र, पाच तासानंतर ही बाेट संपर्क कक्षेच्या बाहेर गेली. त्यानंतर अन्य एजन्सींना याबाबत माहिती देऊन बाेटीचा शाेध सुरू करण्यात आला. त्यानंतर ही बाेटी बाणकाेटी किनारपट्टीपासून ७५ नाॅटिकल मैल अंतरावर पकडण्यात आली.
या बाेटीची तपासणी केली असता बाेटीत ४ हजार शेळ्या, मेंढ्या हाेत्या. या प्राण्यांची तस्करी करून गुजरातकडे नेण्यात येत हाेते. तस्करांनी बोटीची नोंदणी क्रमांक प्लेट बदलली असण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त अमित नायक यांनी सांगितले की, ही बोटी जयगड (ता. रत्नागिरी) बंदरात आणण्यात आली आहे. बाेटीची योग्य चौकशी करण्यात येणार आहे. शेळ्या-मेंढ्यांच्या सुरक्षित संगोपनासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले.