नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या सामंजस्य कराराची शिवसैनिकांनी पुतळा जाळून केली होळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 14:50 IST2018-04-12T14:50:34+5:302018-04-12T14:50:34+5:30
नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाबाबत सौदी देशाशी झालेल्या सामंजस्य कराराची आमसभेच्या ठिकाणी आमदार राजन साळवींच्या नेतृत्वाखाली संतप्त शिवसैनिकांनी आज पुतळा जाळून होळी केली.

नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या सामंजस्य कराराची शिवसैनिकांनी पुतळा जाळून केली होळी
राजापूर - नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाबाबत सौदी देशाशी झालेल्या सामंजस्य कराराची आमसभेच्या ठिकाणी आमदार राजन साळवींच्या नेतृत्वाखाली संतप्त शिवसैनिकांनी आज पुतळा जाळून होळी केली. शिवसेनेने रिफायनरी प्रकल्पाला पूर्वीपासून कडाडून विरोध केला आहे. यापुढे देखील तो कायम राहील शासनाला हा प्रकल्प रद्द करायला भाग पाड, असे आमदार साळवी यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
राजापूर पंचायत समितीची आमसभा येथील श्रीमंगल कार्यालयात गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरु झाली. त्यावेळी आमदार राजन साळवी व त्यांच्या सहकार्यांचे सभास्थानी आगमन झाल्यावर सभागृहाबाहेर संतप्त शिवसैनिकांनी आमदार साळवींच्या उपस्थितत नाणार प्रकल्पावरुन सौदी सरकारशी बुधवारी झालेल्या सामंजस्य कराराची जाहीर होळी करण्यात आली. त्यावेळी आमदार साळवी यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. आमचा प्रकल्पाला कडाडून विरोध राहिला आहे व यापुढेही तो कायम राहणार आहे.
या प्रकल्पाच्या कामांसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसह रत्नागिरी रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल कंपनीचे अधिकारी जर इकडे फिरकले तर त्यांना आम्ही पिटाळून लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला. अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही लढा देऊ व हा विनाशकारी प्रकल्प शासनाला रद्द करायला भाग पाडू, अशा शब्दात त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी अवजड वाहतूक सेनेचे संघटक दिनेश जैतापकर, शहर प्रमुख संजय पवार, उमेश पराडकर, प्रकाश गुरव, अभिजीत तेली, सभापती सुभाष गुरव उपस्थित होते.