रत्नागिरी : जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळवणाऱ्या शिंदेसेनेच्या मंडणगडच्या सदस्य अस्मिता केंद्रे यांची अध्यक्षपदी तर विलास चाळके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून प्रथमच मंडणगड तालुक्याला अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.या निवडीमुळे गेली चार वर्षे सुरू असलेली जिल्हा परिषदेवरील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ३४ व्या अध्यक्ष पदासाठी अस्मिता अनंत केंद्रे आणि उपाध्यक्ष पदासाठी विलास चाळके यांनी महायुतीतर्फे अर्ज दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करताच शिंदेसेनेने जोरदार घोषणा देत जल्लोष केला.नूतन अध्यक्षा केंद्रे आणि उपाध्यक्ष चाळके यांनी लगेचच पदभार स्वीकारला. त्यावेळी आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक, रचना महाडिक, रोहिणी दळवी, रोहन बने, प्रतोद बाबू म्हाप, माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, माजी सभापती दीपक नागले, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.
पाणी समस्येकडे प्राधान्याने लक्ष : अस्मिता केंद्रेउन्हाळ्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावते; मात्र पाण्यासंदर्भात ज्या-ज्या योजना आहेत त्या काहीअंशी व्यवस्थित राबवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेऊन लोकांना मुबलक पाणीपुरवठा कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्षा केंद्रे यांनी सांगितले.
सर्वांना बरोबर घेऊन काम करणार : विलास चाळकेविकासाची कामे करत असताना निधी कमी पडणार नाही. पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत यांचे सहकार्य असणार आहे. पाण्यासह ग्रामीण भागातील सर्वच प्रकारची कामे करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे.
दोनवेळा सदस्यनूतन अध्यक्षा केंद्रे या मंडणगड तालुक्यातील भिंगळोली गटातून निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्या दोनवेळा जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. त्यांनी मंडणगड तालुका समन्वय समिती, कोकण म्हाडाचे सदस्यत्व आणि जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती व वित्त समितीमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.
Web Summary : Asmita Kendre elected Ratnagiri Zilla Parishad President, Vilas Chalke Vice-President unopposed. Mandangad gets first-time honor. Kendre prioritizes water solutions. Chalke emphasizes inclusive development with government support, ending administrative rule.
Web Summary : अस्मिता केंद्रे रत्नागिरी जिला परिषद अध्यक्ष, विलास चालके उपाध्यक्ष निर्विरोध निर्वाचित। मंडणगड को पहली बार सम्मान। केंद्रे पानी की समस्या को प्राथमिकता देंगी। चालके सरकारी समर्थन के साथ समावेशी विकास पर जोर देते हैं।