आपत्तीमध्ये स्थलांतरासाठी शेल्टर हाऊस, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 18:02 IST2025-05-24T18:01:23+5:302025-05-24T18:02:11+5:30
चिपळूण : येत्या पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची आपत्ती कोसळल्यास आपतग्रस्तांची गैरसोय होणार नाही, याबाबतची काळजी सरकार आणि प्रशासन घेत आहे. ...

आपत्तीमध्ये स्थलांतरासाठी शेल्टर हाऊस, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
चिपळूण : येत्या पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची आपत्ती कोसळल्यास आपतग्रस्तांची गैरसोय होणार नाही, याबाबतची काळजी सरकार आणि प्रशासन घेत आहे. कोकण किनारपट्टीवर नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास २४८ कोटी रुपये खर्चून २१ शेल्टर हाऊस बांधली गेली आहेत. स्थलांतरासाठी याचा उपयोग होईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी चिपळुणात पत्रकार परिषदेत दिली.
पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मंत्री सामंत यांनी लोटे येथील घटनेचा आढावा बैठक घेत असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यासंदर्भात महामार्ग विभागाला योग्य त्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह सुस्थितीत व्हावे, यासाठी जिल्हा नियोजनमधून ७५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. चिपळूण शहरातील नालेसफाईतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी धरणांची तपासणी करण्याचेही निर्देश दिले असून, दुर्दैवी घटना घडल्यास स्थलांतराबाबत काय करता येईल, अशी कोणती ठिकाणी आहेत, याबाबतचाही एक तक्ता तयार करण्यात आला आहे.
तसेच कोकण किनारपट्टीवर नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास २४८ कोटी रुपये खर्चून २१ शेल्टर हाऊस बांधली गेली आहेत. स्थलांतरासाठी याचा उपयोग होईल, त्यानंतर सभागृह म्हणून त्याचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
वाशिष्ठीतील एक लाख ८२ हजार क्युबिक मीटर गाळ काढला गेला आहे. काही लोकांनी खत म्हणून हा गाळ विकतही घेतला आहे. पावसाची आकडेवारी दरवर्षी वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. दरडग्रस्त भागाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी पुनर्वसनाबाबत काय करता येईल, याचीही चर्चा झाली आहे.
ब्ल्यू आणि रेड लाईनबाबत नव्याने सर्वेक्षण करण्याची गरज असून, वाशिष्ठी नदीतील बेटे काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डाची परवानगी आवश्यक आहे. त्या संदर्भात मंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.