अस्मानी संकटाचा दुसरा फटकाही मजबूत, आधी अतिवृष्टीने हिरावून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:32 PM2019-11-05T13:32:43+5:302019-11-05T13:42:20+5:30

वर्षभर काबाडकष्ट केल्यानंतर हाता-तोंडाशी आलेला पिकाचा घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्याने संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले भातपीक परतीच्या पावसाने मातीमोल केले. त्यात तालुक्यातील ३० टक्क्यांहून अधिक भातशेतीचे नुकसान झाले आहे.

The second crisis of the sky crisis is even stronger | अस्मानी संकटाचा दुसरा फटकाही मजबूत, आधी अतिवृष्टीने हिरावून नेले

अस्मानी संकटाचा दुसरा फटकाही मजबूत, आधी अतिवृष्टीने हिरावून नेले

Next
ठळक मुद्देआधी अतिवृष्टीने हिरावून नेले, वादळसदृश पावसाने आणखी घाव घातलेशेतकऱ्यांची व्यथा अधिकच गडद

सचित मोहिते

देवरूख : वर्षभर काबाडकष्ट केल्यानंतर हाता-तोंडाशी आलेला पिकाचा घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्याने संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले भातपीक परतीच्या पावसाने मातीमोल केले. त्यात तालुक्यातील ३० टक्क्यांहून अधिक भातशेतीचे नुकसान झाले आहे.

यावर्षी कोकणात चांगला पाऊस बरसला होता. त्यामुळे भाताचे पीक चांगले मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये संततधार कोसळलेल्या पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले. यानंतर भातशेती कापणीच्या ऐन हंगामात संगमेश्वर तालुक्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात पिकाचे अपरिमित नुकसान झाले आहे.

शेतकरी शेतावर वर्षभर राबत असतो. अपार कष्ट करुन घाम गाळून तो शेती पिकवितो आणि जेव्हा तयार झालेली शेती पिवळी धमक सोनेरी होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असते. मात्र, याच्या उलट जेव्हा परिस्थिती ओढवते. तेव्हा हाच शेतकरी हबकून जातो. मात्र, तरीही तो हिंमत हरत नाही.

कुजलेल्या अवस्थेतीलदेखील भाताचा एक एक दाणा निवडून घरी आणण्याचा प्रयत्न करतो. यावेळी शेतकऱ्यांच्या घामाबरोबरच डोळ्यांतून अश्रू देखील ओघळले जातात आणि म्हणूनच जेव्हा वर्षभर केलेल्या श्रमाचे चीज होत नाही तेव्हा शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने भरीव मदतीची गरज असते. अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकरी वर्गामधून तालुक्यातून उमटत आहे.

संगमेश्वर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आहे. साखरप्याच्या टोकापासून ते आरवलीपर्यंत वसलेला आहे. या तालुक्यातील बोंड्ये, मारळ, निवे, खडीकोळवण, साखरपा, कोंडगाव, वांझोळे, बामणोली, आंगवली, मुरादपूर, हातीव, देवरुख, कोसुंब, करंबेळे, तेºहे, माभळे, बावनदी, परचुरी, कोळंबे, माखजन दशक्रोशी, कसबा, पंचक्रोशी आदी गावांमधील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

पाऊस, ढगाळ वातावरण आणि क्यार वादळ अशा तिहेरी संकटात भातपीक सापडले. त्यामुळे उभे असलेले पीक काही दिवसांपूर्वी आलेल्या क्यार वादळात भुईसपाट झाले. जोडीला पावसाची रिपरित असल्याने शेतात पडलेल्या भाताला कोंब येण्याची प्रक्रिया सुरू झाली. तर काही ठिकाणी भात पूर्णत: कुजले आहे.

विविध संघटना आणि वृत्तपत्रातून जोरदार मागणी झाल्यानंतर शासनाने दखल घेतली आणि पंचनामे सुरू झाले. काही गावांतील पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, अनेक गावांतून भातशेती कुजलेल्या अवस्थेत असतानाही कापण्यात आली होती. जे काही मिळेल ते भात हाती यावे, अशा विचाराने ते कापण्यात आले. मात्र अशा शेतीच्या नुकसानाचे पंचनामे केले नसल्याचे अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत.

कापलेल्या शेतीचेही होणार पंचनामे

नुकसान झालेली शेती कापली असेल आणि अशा शेतकऱ्यांनी बाधित क्षेत्र आपल्या गावातील पंचनामा करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, कृषीपर्यवेक्षक यांच्या निदर्शनास आणून दिले तरीही पंचनामे केले जातील, असेही नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. याबरोबरच ज्या शेतकऱ्यांचे शेतीच्या नुकसानाचे पंचनामे झाले नसतील, अशा शेतकऱ्यांनी देवरूख तहसीलदार कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी (०२३५४) २६००२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार सुहास थोरात यांनी केले आहे.

कसणाऱ्याला भरपाई मिळावी

तालुक्यातील अनेक शेतकरी दुसऱ्याची शेती कसताना दिसत आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेली जमीन कसण्याची परंपरा अनेक ठिकाणी अजूनही सुरू आहे. मात्र, भरपाई मिळते जमीन मालकांना. जमीन कसणाऱ्याला भरपाई मिळावी, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.


संगमेश्वर तालुक्यात एकूण १९६ इतकी गावे आहेत. ११ हजार ६१३ हेक्टर आर इतके क्षेत्र लागवडीखालील असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे. या ११,६१३ हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ३५५.५५ हेक्टर क्षेत्र सध्या बाधित झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात आहे, तर ऑगस्ट महिन्यामध्ये आलेल्या पुरामुळे २६०.७९ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले आहे. सोमवारपर्यंत ५,२५९ शेतकऱ्यांचे १०५९.५३ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
 

Web Title: The second crisis of the sky crisis is even stronger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.