ऑक्सिजन सिलिंडर विना एका श्वासात १२० फूट खोल समुद्रात पोहोचते समृद्धी, महाराष्ट्रातील एकमेव फ्री डायव्हिंग प्रशिक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 19:39 IST2025-10-24T19:37:20+5:302025-10-24T19:39:41+5:30
ऑक्सिजन सिलिंडरचा वापर न करता, फक्त एका श्वासावर खोल समुद्रात प्रवेश

ऑक्सिजन सिलिंडर विना एका श्वासात १२० फूट खोल समुद्रात पोहोचते समृद्धी, महाराष्ट्रातील एकमेव फ्री डायव्हिंग प्रशिक्षक
चिपळूण : एका श्वासात तब्बल १२० फूट खाेल समुद्रात जाणाऱ्या चिपळुणातील समृद्धी देवळेकर हिने महाराष्ट्रातील एकमेव फ्री डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. चिपळूणचे माजी नगरसेवक राजू देवळेकर यांची ती कन्या आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत शिक्षणाविषयी आवड, प्रशिक्षक आणि आई-वडील यांच्या पाठबळावरच मी हे शिक्षण घेऊ शकले, असे समृद्धी हिने सांगितले.
फ्री डायव्हिंग ही एक अनोखी जलक्रीडा आहे. ज्यामध्ये कोणत्याही ऑक्सिजन सिलिंडरचा वापर न करता, फक्त एका श्वासावर खोल समुद्रात प्रवेश केला जातो. ही केवळ शारीरिक ताकदीची नाही, तर मानसिक स्थैर्य, आत्मनियंत्रण आणि निसर्गाशी एकरूप होण्याची एक साधना आहे. समृद्धी सध्या एका श्वासात तब्बल १२० फुटांहून अधिक खोल डाइव्ह करू शकते आणि ४ मिनिटांहून अधिक वेळ श्वास रोखून ठेवू शकते.
समृद्धीचं आयुष्य सुरुवातीला आकाशाशी जोडलेलं होतं. ती एक ट्रेनी पायलट होती; पण पंखांमधून पाण्यात उतरलेली तिची ही कथा फारच अद्वितीय आहे. ती फिलिपिन्समधून आंतरराष्ट्रीय पातळीवर फ्री डायव्हिंग प्रशिक्षण व कार्यशाळा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील डायव्हर्स ऑफ विंगोरीय यांच्यासोबत प्रशिक्षण देण्यासाठी दाखल झाली आहे.
ती फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांनाही खोल पाण्याशी नातं जोडण्यासाठी एक ‘ब्रीज टू द ओशन’ बनली आहे. एका श्वासावर खोल समुद्रात प्रवेश करणाऱ्या समृद्धीने ध्येय, चिकाटी आणि निसर्गाशी प्रेम केल्यास अशक्य काहीच नसते, हे दाखवून दिले आहे.
फ्री डायव्हिंग इन्स्ट्रक्टर
समृद्धी देवळेकर हिने आपल्या ध्येय, मेहनत आणि निसर्गप्रेमाच्या जोरावर चिपळूणचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं आहे. समृद्धी आता प्रमाणित पीएडीआय फ्री डायव्हिंग इन्स्ट्रक्टर बनली असून, अशी मान्यता मिळवणाऱ्यांपैकी ती भारतातील मोजक्या व्यक्तींमध्ये एक आहे.
भारतीयांमध्ये अपार क्षमता
समृद्धीचा ठाम विश्वास आहे की, भारतीयांमध्ये फ्री डायव्हिंगसाठी अपार क्षमता आहे. आपल्याकडे असलेली मानसिक शांतता, योगाभ्यासाची परंपरा, शारीरिक सहनशक्ती आणि आत्मनियंत्रण या सर्व गुणांमुळे आपण या खेळात जागतिक स्तरावर आघाडी घेऊ शकतो, असे ती सांगते.