कशेडी तपासणी नाक्यावर तो एस्. टी. सुरू करणार इतक्यात अचानक त्याच्या छातीत दुखू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:23 IST2020-05-06T16:15:31+5:302020-05-06T16:23:26+5:30
चेक नाक्यावर हजर असलेल्या अन्य सहकाऱ्यांनी त्याला नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णणावाहिकेने तत्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णलयात उपचारांसाठी आणले. मात्र त्याच्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच निधन झाले.

कशेडी तपासणी नाक्यावर तो एस्. टी. सुरू करणार इतक्यात अचानक त्याच्या छातीत दुखू लागले
खेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील कशेडी येथे सुरु करण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या एका एस्. टी. कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नितीन नलावडे (३२) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मुंबई, पुणे यासारख्या रेडझोनमधून कोकणात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे तपासणी नाका सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी कर्तव्यावर असलेले महसूल, पोलीस व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्याकडून मुंबई पुणे, ठाणे येथून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना चेकनाक्यावर तैनात ठेवलेल्या एस्. टी. बसने क्वॉरंटाईन सेंटरवर नेऊन १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईन केले जाते.
नितीन नलावडे हे एस्. टी. चालक हेच कर्तव्य बजावण्यासाठी मंगळवारी रात्री कशेडी येथे कर्तव्यावर होते. बुधवारी सकाळी ६.१० वाजण्याच्या सुमाराला तो मुंबई, पुणे येथून आलेल्या नागरिकांना घेऊन लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या क्वॉरंटाईन सेंटरकडे निघाला होता. तो एस्. टी. सुरू करणार इतक्यात अचानक त्याच्या छातीत दुखू लागले.
वेदना असह्य झाल्याने तो एस्. टी. तून खाली उतरला. मात्र, त्याला उभे राहणे शक्य न झाल्याने रस्त्यातच आडवा झाला. चेक नाक्यावर हजर असलेल्या अन्य सहकाऱ्यांनी त्याला नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णणावाहिकेने तत्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णलयात उपचारांसाठी आणले. मात्र त्याच्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच निधन झाले. खेड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.