ऐकावे ते नवलच! रत्नागिरीत आहे १०० कोटी रुपयांचे झाड; वय पाहून भिरभिराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 18:46 IST2021-10-03T18:42:37+5:302021-10-03T18:46:20+5:30
Red Sandalwood tree: काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा देखील आसपसाच्या परिसात केली जाते. पर्यावरण तज्ज्ञ संदीप कांबळे यांनाही रक्तचंदन हे कोकणात आढळून येणे ही बाब दुर्मीळ असल्याचे सांगितले.

ऐकावे ते नवलच! रत्नागिरीत आहे १०० कोटी रुपयांचे झाड; वय पाहून भिरभिराल
- तन्मय दाते
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तुम्हाला १०० कोटी रुपयांचं झाड पाहायचं आहे का? हे झाड आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चाफवली या गावातील देवराईमध्ये! या झाडाची किंमत एवढी आहे, कारण हे झाड आहे रक्तचंदनाचे! आणि या झाडाचं वय आहे अंदाजे दीडशे वर्ष. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला प्रचंड मागणी आहे. सध्या स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभाग या झाडावर लक्ष ठेवून आहेत. (Red Sandalwood tree worth Rs 100 crore in Ratnagiri; age is around 150 years)
रक्त चंदन हे विशेषता तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील चित्तुर,कडप्पा, कुरनुल आणि नेल्लोर चार जिल्ह्यांमध्ये आढळतात. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, चीन इत्यादी ठिकाणी याचा मोठा व्यापार होतो. त्यामुळे कोकणात हे झाड आले कसे? याची माहिती कोणालाही नाही.
‘खरं’सांगायचं झालं तर हे झाड इथं आले कसे याची गावातील कुणालाही कल्पना नाही. साधारण ३० ते ४० वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये कातभट्टी चालायच्या. त्यावेळी कातकरी समाज हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असे. त्यांचे बैल जेव्हा आजारी पडायचे तेव्हा ते या झाडाची साल उगाळून देत असतं. त्यानंतर हे बैल ठणठणीत होत. त्यामुळे हे झाड औषधी आहे हे आम्हा गावकऱ्यांना माहितीचे होते. काही वर्षांपुर्वी या ठिकाणाची झाडं तोडली गेली पण जी झाड औषधी व दुर्मिळ झाड तोडायची नाहीत, असा एकमुखी निर्णय झाला. पाच वर्षापूर्वी कुणीतरी अभ्यास केला व याचा गर काढून हे झाड रक्त चंदनाचे आहे असे सांगितले. पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत किंवा इंग्रजांनी या देवराईत ते लावले आसावे, असा अंदाज गावातील प्रकाश चाळके यांनी व्यक्त केला.
काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा देखील आसपसाच्या परिसात केली जाते. यानंतर देवरूख वनविभागाचे वनपाल तौफिक मुल्ला यांनी ‘सध्या झाडाच्या सुरक्षेसाठी आम्हीदेखील ठराविक अंतरानंतर, वेळेनंतर याठिकाणी गस्त घालत असतो. शिवाय महसूल विभागही लक्ष ठेवून आहे. मुख्य बाब म्हणजे गावकऱ्याचा सहभागदेखील मोठा आहे. यावेळी त्यांच्यासोबत वनरक्षक मिलींद डाफळे, न्हानू गावडे होते.
पर्यावरण तज्ज्ञ संदीप कांबळे यांनाही रक्तचंदन हे कोकणात आढळून येणे ही बाब दुर्मीळ असल्याचे सांगितले. बाजारात सध्या रक्तचंदनाला पाच ते सहा हजार रूपये प्रति किलो असा दर आहे.