Ratnagiri ZP Election Voting 2026: रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड
By अरुण आडिवरेकर | Updated: February 7, 2026 13:54 IST2026-02-07T13:53:54+5:302026-02-07T13:54:49+5:30
नाराज झालेल्या मतदारांनी केंद्रांवरुन माघारी जाणे पसंत केले

Ratnagiri ZP Election Voting 2026: रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड
रत्नागिरी : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५६ आणि पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह कमी पाहायला मिळत होता. सकाळी ९:३० वाजेपर्यंत केवळ ११.४७ टक्केच मतदान झाले होते. मात्र, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने गोंधळ उडाला होता. चिपळुणात तब्बल ४५ मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात शनिवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागात मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चिपळूण तालुक्यातील खेर्डी जिल्हा परिषद गटामध्ये तब्बल चार ते पाच मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्या.
तसेच शिरगाव, सावर्डे कॉलनी, पिंपळ मोहल्ला, कुडप, गुढेकरवाडी, मांडकी, खरवते, कोंढरताम्हाणे, कापरे, कापसाळ, कळंबस्ते, पेढांबे, पिंपळी, सती-चिंचघरी, कळवंडे, कुडप, मालघर कोंढे, शिरगाव याठिकाणीही मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या.
त्याचबरोबर दापोलीतील उटंबर आणि खेड तालुक्यातील बोरज याठिकाणी मशीन बंद पडल्याने मतदारांना प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे नाराज झालेल्या मतदारांनी केंद्रांवरुन माघारी जाणे पसंत केले.