‘ऑपरेशन शिवधनुष्य’ला रत्नागिरीतून सुरुवात, उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख शिंदेसेनेत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 18:55 IST2025-01-25T18:54:57+5:302025-01-25T18:55:21+5:30
एकनाथ शिंदे १५ फेब्रुवारीला रत्नागिरी दौऱ्यावर

‘ऑपरेशन शिवधनुष्य’ला रत्नागिरीतून सुरुवात, उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख शिंदेसेनेत दाखल
रत्नागिरी : उद्धवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी सहकाऱ्यांसह अखेर शुक्रवारी शिंदेसेनेत प्रवेश करत उद्धवसेनेला ‘दे धक्का’ दिला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशानंतर राज्यातील ‘ऑपरेशन शिवधनुष्य’ला रत्नागिरीतून सुरुवात झाल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरीमध्ये उद्धवसेनेत फूट पडणार असल्याची चर्चा रंगली हाेती. मात्र, पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, विभागप्रमुख महेंद्र झापडेकर, विभागप्रमुख आप्पा घाणेकर, उपविभागप्रमुख दत्ता तांबे यांच्यासह खंडाळा, करबुडे, मालगुंड, हरचिरी या भागातील सरपंच, उपसरपंच, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख राजेश मुकादम, शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांनी स्वागत केले.
मंत्री सामंत म्हणाले की, ‘ऑपरेशन शिवधनुष्य’, ‘ऑपरेशन टायगर’ याची सुरुवात प्रदीप साळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतून होत आहे. येथे जुना-नवा वाद नसून आपण कुटुंब म्हणून काम करत आहोत. लवकरच साळवी यांच्यावर नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यावेळी कोणालाही दुखावले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्हाप्रमुखांचे स्थान पक्के
जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी भाषणात यापुढे आपण जिल्हाप्रमुख पदावर राहू की नाही, अशी शंका उपस्थित केली. त्यावर आमदार किरण सामंत यांनी पंडित यांना कोणत्याही परिस्थितीत बदलण्यात येणार नाही, असे जाहीर करून राहुल पंडित यांचे स्थान पक्के केले.
अदृश्य शक्ती म्हणून काम केले
अदृश्य शक्ती म्हणून बंड्या साळवी यांनी आपले काम केले. पण ते आता थेट व्यासपीठावर आले आहेत. त्यांनी मोठेपणाने सांगितले की, दोन वर्षांपासून आमच्या बैठका सुरू होत्या. या बैठकांतून कशा पद्धतीने पुढे जायचे ते ठरवत होतो. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्येही सहकार्य केल्याचे सामंत म्हणाले.
३ फेब्रुवारीपासून शिंदेसेनेतील पक्षप्रवेशाची मोहीम
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेवर मोठी मात करणाऱ्या शिंदेसेनेचे काम बघून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धवसेनेतून बाहेर पडण्यास उत्सुक आहेत. शुक्रवारी रत्नागिरीत झालेला कार्यक्रम ही झलक होती. ३ फेब्रुवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत वेगवेगळ्या भागातील उद्धवसेनेचे पदाधिकारी शिंदेसेनेत येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
१५ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हाही काही प्रातिनिधिक प्रवेश होतील. उद्धवसेनेतील माजी आमदार, माजी जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असे अनेक जण शिंदेसेनेत येण्यास उत्सुक आहेत. आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातूनही अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.