Ratnagiri scarcity fuels excavation, water supply survey | रत्नागिरीतील टंचाईला विंधन विहिरींचा उतारा, पाणी असलेल्या जागांची पाहणी

रत्नागिरीतील टंचाईला विंधन विहिरींचा उतारा, पाणी असलेल्या जागांची पाहणी

ठळक मुद्देरत्नागिरीतील टंचाईला विंधन विहिरींचा उतारा, पाणी असलेल्या जागांची पाहणीतज्ज्ञांमार्फत रत्नागिरी शहरात विंधन विहिरींसाठी सर्वेक्षण

प्रकाश वराडकर 

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पाणीटंचाई आता अधिकच तीव्र झाली आहे. दररोज पाणी नाही, पाणी द्या, म्हणून शहराच्या विविध भागातील महिला नगर परिषदेवर हल्लाबोल करीत आहेत. नळांना कमी दाबाने पाणी येत असताना टॅँकरचे पाणीही शहरवासियांना पुरत नसल्याने आता या टंचाईवर विंधन विहिरींचा उतारा केला जाणार आहे. त्यासाठी शहरात पाणी असलेल्या जागांचे सर्वेक्षण सुरू असून, किमान १० ते १५ विंधन विहिरी उभारण्याचा नगर परिषदेचा प्रस्ताव आहे.

शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी सुधारित नळपाणी योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, हे काम सुरु होऊन प्रत्यक्ष पाणी मिळेपर्यंत दीड वर्षाचा कालावधी जाणार आहे.

शीळमध्ये अपुरा पाणीसाठा

रत्नागिरी शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातही यंदा पाण्याचा अपुरा साठा आहे. गेल्या पावसाळ्यात हे धरण पूर्ण भरले होते. मात्र, सुरुवातीला पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ओढ दिल्याने घसरलेली धरणपातळी पुन्हा भरून निघाली नाही.

आता विंधन विहिरींचा उपाय!

शहराच्या काही भागात पाणीच येत नाही. टॅँकरने पुरवठाही अपुरा पडत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील टंचाईच्या तीव्र झळा बसणाºया भागांमध्ये विंधन विहिरी उभारण्यासाठी तज्ज्ञांमार्फत तातडीने सर्वेक्षण केले जात आहे. आवश्यक तेथे पाणीसाठा असल्यास अशा ठिकाणी विंधन विहिरी अर्थात बोअरवेल उभारल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी लोकमतला दिली.

टॅँकरच्या दररोज ५५ फेऱ्या

शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून सध्या शहरातील विविध भागात टॅँकरमधून पाण्याच्या रोज ५५ फेऱ्या मारल्या जात आहेत. गेल्या पावसाळ्यात पाऊस कोसळत असतानाही टॅँकरने पाणी पुरवण्याची वेळ नगर परिषदेवर आली होती. टॅँकरने अद्याप पाठ सोडलेली नाही.

धरणावर नवीन बंधारा

पानवल धरणातील पाणी नेहमीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातच संपले आहे, तर नाचणे तलावातून मिळणारे ०.५ दशलक्ष लीटर पाणीही तलाव आटल्याने पाणी स्थिती शहरात गंभीर झाली आहे. सुधारित नळपाणी योजनेमध्ये पानवल धरणावर नवीन बंधारा उभारण्यात येणार आहे. मात्र, त्याला अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे.

रोज १६ दशलक्ष लीटरची गरज

रत्नागिरी शहराला दररोज १६ ते १८ दशलक्ष लीटर पाणी लागते. सध्या शीळ धरणावरून १२ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा शहराला होत आहे, तर एमआयडीसीकडून दररोज एक ते दीड दशलक्ष लीटर पाणी रत्नागिरी शहराला पुरविले जाते. त्यातही जुन्या वितरण वाहिन्या व जुनी मुख्य जलवाहिनी यामुळे जागोजागी फुटण्याचे प्रकार व त्यातून होणारी गळती मोठी असल्याची खंत आहे.

पाणी आले तर आले...

जुुनाट झाल्याने वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्या दुरुस्त करायलाही कर्मचाऱ्यांना वेळ पुरत नाही, अशी स्थिती सध्या आहे. त्यामुळे शहरातील अनेक भाग असे आहेत की, तेथे नळाला पाणी येईल की नाही, याची खात्री देता येत नाही. पाणी आले तर आले, अशी विचित्र स्थिती आहे. गेल्या काही वर्षांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा ही समस्या रत्नागिरीकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे.

पाणी १५ जूनपर्यंत पुरेल

यावर्षी १५ जूनपर्यंत पुरेल इतकाच साठा या धरणात आहे. त्यामुळे यावेळी पाऊस उशिरा सुरू झाला, तर जलसंकट गंभीर होण्याची भीती आहे.

नागरिकांना तोंड देताना हैराण

पाणी समस्येमुळे सातत्याने शहरातील महिलावर्ग पाणी आलेच नाही, पाणीच येत नाही, अशा तक्रारी घेऊन प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी, पाणी समिती सभापती सुहेल मुकादम यांच्याकडे येत आहेत. पाणी समस्येवरून त्यांना तोंड देताना सर्वच पदाधिकारी हैराण झाले आहेत. गेल्या काही महिन्यात रत्नागिरी नगर परिषदेवर पाण्यासाठी सातत्याने हल्लाबोल करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. अनेक प्रभागांमधून महिलांनी पाण्यासाठी नगर परिषदेकडे धाव घेतली होती.

Web Title: Ratnagiri scarcity fuels excavation, water supply survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.