Ratnagiri: परशुराम घाटात लोखंडी जाळ्यांचे संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 05:26 IST2025-01-20T05:25:38+5:302025-01-20T05:26:00+5:30
Ratnagiri News: मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्यात येत आहे. संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबिंगवॉल उभारण्यात येत आहे.

Ratnagiri: परशुराम घाटात लोखंडी जाळ्यांचे संरक्षण
चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्यात येत आहे. संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबिंगवॉल उभारण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्याचे महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रयत्न आहेत.
परशुराम घाटात गेल्या दोन ते तीन वर्षांत भराव टाकून व एका बाजूला डोंगर कटाई करून रुंद केलेल्या मार्गावर छोट्या-मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. घाटात भरावाच्या ठिकाणी रस्ता खचणे व संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही ठिकाणी संरक्षक भिंत असलेल्या डोंगराच्या बाजूकडील दरडी काेसळत आहेत.
घाटात ड्रिलद्वारे लोखंडी रॉड टाकून त्याचे मजबुतीकरण
परशुराम घाटात उपाययोजना केल्या जात आहेत. कोकण रेल्वेने दरडीच्या ठिकाणी ज्या पद्धतीने जाळ्या उभारून मार्ग सुरक्षित केला आहे.
अगदी त्याच धर्तीवर घाटातील ४० मीटर उंच व ९०० मीटरच्या अंतरात लोखंडी जाळी मारून दरडीचा भाग सुरक्षित केला जात आहे.
घाटात ड्रिलद्वारे लोखंडी रॉड टाकून त्याचे मजबुतीकरण केले जात आहे. हे काम उत्तराखंडमधील शासकीय कंपनीकडे सोपविण्यात आले आहे.
संरक्षक भिंत कमकुवत
घाटातील रस्ता रुंद करण्यासाठी सुमारे ७० ते ८० टक्के भागात मूळ जुन्या रस्त्यावर भराव टाकून हा भाग १० ते १५ फूट उंच करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला डोंगर कटाई करून कमकुवत संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत.