‘रत्नागिरी हापूस’ स्थानिक बाजारपेठेत दाखल, गतवर्षीपेक्षा एक महिना उशिरा एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:31 IST2026-03-07T15:30:41+5:302026-03-07T15:31:02+5:30

बदलत्या वातावरणाचा आंबा पिकाला बसला फटका

Ratnagiri Hapus enters the local market, one month later than last year | ‘रत्नागिरी हापूस’ स्थानिक बाजारपेठेत दाखल, गतवर्षीपेक्षा एक महिना उशिरा एंट्री

‘रत्नागिरी हापूस’ स्थानिक बाजारपेठेत दाखल, गतवर्षीपेक्षा एक महिना उशिरा एंट्री

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : नैसर्गिक दृष्टचक्रातून शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नाने वाचलेला रत्नागिरी हापूस अखेर शुक्रवारी (दि. ६ मार्च) रत्नागिरीच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल एक महिना उशिराने आंबाबाजारात आला असून, प्रमाणही अल्प असल्याचे विक्रेते सतीश पवार यांनी सांगितले.

नोव्हेंबरपर्यंत पडलेला पाऊस, ऑक्टोबर हीटचे अल्प प्रमाण, डिसेंबरपासून सुरू झालेली थंडी अशा बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसला. त्याचबराेबर पावसासह थंडीचे सर्वाधिक प्रमाण राहिल्याने फुलोरा मोठ्या प्रमाणावर आला. मात्र, अति थंडीमुळे अपेक्षित फळधारणा झाली नाही. शिवाय थंडीमुळे आलेला मोहर काळा पडून गळून गेला. सद्य:स्थितीत १० ते १५ टक्के इतकाच आंबा झाडावर आहे. शिवाय गेल्या काही दिवसात उष्मा वाढल्यामुळे आंबा भाजू लागला आहे.

नैसर्गिक संकटातून बचावलेला आंबा तयार होऊ लागला आहे. पावस (ता. रत्नागिरी) येथील बागायतदारांनी शुक्रवारी तोड केलेला आंबा सतीश पवार यांच्या स्टाॅलवर विक्रीसाठी पाठविला आहे. सध्या दोन ते अडीच हजार रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. गतवर्षी सुरुवातीला तीन हजार ते साडेतीन हजार रुपये डझन दर हाेता. मात्र, आंब्याची आवक कमी असल्याने पवार यांच्या स्टाॅलवर पहिलीच आवक अडीच डझन एवढीच झाली आहे.

पायरी, रायवळ कैरी उपलब्ध

रत्नागिरीतील पवार यांच्या स्टाॅलवर देवगड हापूस, पायरी तसेच रायवळ कैरीही विक्रीसाठी उपलब्ध आहे. पायरी १८०० ते दोन हजार रूपये डझन, तर कैरी १२० ते १५० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे.

गेली ४५ वर्षे हा व्यवसाय करीत आहाेत. यावर्षी प्रथमच आंबा कमी असून, विक्रीसाठी आंबा उशिरा दाखल झाला आहे. एकूणच उत्पादन कमी असल्यामुळे आंबा विक्रीला कमी असेल. आंबा कमी असल्यामुळे दर टिकतील अशी अपेक्षा आहे. - सतीश पवार

Web Title : रत्नागिरी हापुस देर से बाजार में, आपूर्ति सीमित

Web Summary : मौसम के कारण रत्नागिरी हापुस आम एक महीने देरी से पहुंचा। उपज कम है, कीमतें ₹2,000-2,500 प्रति दर्जन हैं। अन्य किस्में भी उपलब्ध हैं।

Web Title : Ratnagiri Alphonso Arrives Late to Market, Supply Limited

Web Summary : Ratnagiri Alphonso mangoes arrived a month late due to weather, with low yields. Prices are ₹2,000-2,500 per dozen. Other varieties are also available.