रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 22:32 IST2025-07-19T22:31:44+5:302025-07-19T22:32:52+5:30
मृतांमध्ये तीन बहिणी आणि त्यातील एका महिलेचा पती अशा चौघांचा समावेश

रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: फिरण्यासाठी आरेवारे येथे गेलेल्या चौघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मृतांमध्ये तीन बहिणी आणि त्यातील एका महिलेचा पती अशा चौघांचा समावेश आहे. पावसामुळे समुद्र खवळलेला होता आणि लाटांचा अंदाज न आल्याने चौघेजण बुडाले. स्थानिक व्यावसायिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांना मृत्यूने गाठले. उज्मा शामशुद्दीन शेख (१८), उमेरा शामशुद्दीन शेख (२९, दोघी रा. मुंब्रा, ठाणे), जैनब जुनैद काझी (२६), जुनैद बशीर काझी (३०, दोन्ही रा. ओसवालनगर, रत्नागिरी), अशी या चौघांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे मुंब्रा येथून उज्मा शेख, उमेरा शेख (२९) या दोघी जणी रत्नागिरीतील त्यांची बहीण जैनब काझी हिच्याकडे आल्या होत्या. शनिवारी सायंकाळी त्या तिघी आणि जैनब काझी हिचा पती जुनैद बशीर काझी असे चौघेजण सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आरेवारे येथे फिरण्यासाठी गेले होते. या चौघांना पाण्यात खेळण्याचा मोह आवरला नाही. मात्र, समुद्र खवळलेला होता. त्यातच दुपारपासून पावसाला सुरुवात झाली होती. उसळी घेणाऱ्या लाटांचा अंदाज त्यांना आला नाही आणि अचानक उसळलेल्या मोठ्या लाटेमुळे हे चौघेही पाण्यात ओढले गेले.
जीव वाचवण्यासाठी त्यांचा आकांत सुरू झाला. काही वेळ एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला; परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक मदतीसाठी धावले. त्यांनी बुडालेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचेही प्रयत्न असफल ठरले. दरम्यान, ग्रामीण पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. अखेर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना पाण्यातून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना तातडीने तपासण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्या चौघांचीही प्राणज्योत मालवली होती.
आई-वडील सौदीला
या दुर्दैवी घटनेत मृत झालेल्या तीन बहिणींचे आई-वडील उंब्रा करण्यासाठी (पूजा करण्यासाठी) सौदी येथे गेले आहेत. यादरम्यान दोन बहिणी आपल्या रत्नागिरीतील बहिणीकडे आल्या होत्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात खूप मोठी गर्दी झाली होती.