Ratnagiri district has a loss of Rs | रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे २६ कोटी ७५ लाखांचे नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे २६ कोटी ७५ लाखांचे नुकसान

ठळक मुद्दे- अजूनही पंचनाम्याचे काम सुरू- अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला- दिवाळीत सारेच गमावले

रत्नागिरी : ‘क्यार’ वादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबद्दल प्रशासनाकडून पंचनामे सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण ७९ हजार १४४.६२ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यामध्ये ५३ हजार ९६७ शेतक-यांचे ११,७०६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने २६ कोटी ७५ लाख ७७ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

‘क्यार’ वादळानंतर आठवडाभर सतत पाऊस सुरु होता. यामुळे भात खाचरातून मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. अनेक शेतकऱ्यांचे कापलेले भात शेतातच राहिल्याने पाण्यात तरंगत होते. बहुतांश कापलेल्या भाताला कोंब आले. याशिवाय वाºयामुळे जमीनदोस्त झालेल्या भातालाही अंकुर आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पावसामुळे कापलेले भात उचलण्याची उसंत शेतकºयांना लाभली नाही. शिवाय पावसाचे पाणी उडवीत शिरल्याने उडवी रचलेल्या भातालादेखील अंकुर आल्याने शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले.

दीपावली सुट्टीनंतर कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी पंचनामा प्रक्रियेमध्ये व्यस्त आहेत. आतापर्यंत सर्वाधिक नुकसान लांजा तालुक्यात झाल्याचे निदर्शनास येत आहे. ६,५५२ शेतक-यांचे १,११५.७१ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने ८ कोटी ७ लाख ९८ हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ खेड तालुक्यातही नुकसान झाले आहे. ४,५९२ शेतकºयांचे १५०४.६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे ६ कोटी ५४ लाख ५३ हजाराचे नुकसान खेड तालुक्यात आहे. दापोली तालुक्यामध्ये मात्र सर्वात कमी नुकसान झाले असून, ५,१७७ शेतकºयांचे ७६८.६९ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. तेथे ५२ लाख २६ हजाराचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केवळ ३०५ शेतकऱ्यांनी खरीप विमा योजनेचा लाभ घेतला होता. १४०.८५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित आहे. जिल्ह्यात पंचनामे करीत असताना काढणीपश्चात पिकांचे नुकसान व उभ्या पिकांचे नुकसान अशा दोन पद्धतीने वर्गवारी काढण्यात आली आहे. काढणीपश्चात १५,९८० शेतकऱ्यांचे ३ हजार २३०.३४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तर उभ्या पिकांमध्ये ३७ हजार ९५७ शेतकºयांचे ८ हजार ४७५.९७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अद्याप पंचनाम्याची प्रक्रिया सुरु आहे. पंचनाम्याचा दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येत आहे.

भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी शेतकरी बांधव मात्र उर्वरित शेती कापण्याच्या कामामध्ये व्यस्त आहे. ग्रामीण भागामध्ये कापणीची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी सामुहिक पद्धतीने भातकापणी केली जात आहे. १ ते २ दिवस कापलेले भात शेतावरच वाळविण्यात येत आहे. त्यानंतर मळणी करुन भात घरात आणण्यात येत आहे. काही शेतकरी मात्र उडवी रचून ठेवत आहेत.

मळे शेतीमध्ये अद्याप पाणी असल्याने गुडघाभर चिखलातून भातकापणी केली जात आहे. कापलेले भात कोरड्या क्षेत्रावर नेवून वाळविले जात असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी परिश्रम घ्यावे लागत आहेत. त्यातच काही ठिकाणी भातक्षेत्रावर लष्करी अळीने हल्ला केल्यामुळे शेतक-याना लोंब्या गोळा कराव्या लागत आहे. लष्करी अळीमुळे शेतकरी बांधवांच्या नुकसानात आणखी भर पडली आहे. भाताबरोबर नागलीची कापणीदेखील शेतकरी बांधवांनी सुरु केली आहे. पावसामुळे भातकापणीच्या कामाला विलंब होत असल्याने रब्बीच्या पेरण्या उशिरा होण्याच्या शक्यता आहे.

नुकसान भरपाईची रक्कम तुटपुंजी
‘क्यार’ वादळानंतर झालेल्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाल्याने राज्य शासनाने नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान लक्षात घेता शासनाकडून तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. गुंठ्याला ६८ रूपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम मिळणार असल्याने शेतकरी बांधवांमधून नाराजी व्यक्त होत आहे. एखाद्या शेतकऱ्याचे पाच गुंठ्यावरील नुकसान असले तर ३४० रूपये इतकी अत्यल्प रक्कम दिली जाणार आहे.

ऑनलाईन रक्कम
नुकसानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँकेतील खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे बँकेत खाते उघडण्यासाठी कागदपत्र, सहहिस्सेदारांची संमत्ती आदी कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा खर्च मात्र नुकसान भरपाईच्या रकमेपेक्षा अधिक आहे. शिवाय बँक खाते उघडण्यासाठी किमान ५०० रूपये खात्यात ठेवणे गरजेचे आहे. 

Web Title: Ratnagiri district has a loss of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.