रत्नागिरी-बेळगाव बसने घेतला पेट, ९ प्रवासी जखमी; आंबा घाटाच्या पायथ्याशी दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 18:14 IST2022-11-18T18:12:20+5:302022-11-18T18:14:05+5:30
गाडीसमाेर काेंबडा आडवा आला. चालकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता गाडी बाजूला उलटली. गाडी जमिनीवर पडताच डिझेल टाकी लिकेज झाली आणि गाडीने पेट घेतला.

रत्नागिरी-बेळगाव बसने घेतला पेट, ९ प्रवासी जखमी; आंबा घाटाच्या पायथ्याशी दुर्घटना
साखरपा : रत्नागिरीहून बेळगावला जाणारी कर्नाटक आगाराची बस उलटून पेटल्याची घटना गुरुवारी (१७ नाेव्हेंबर) सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटाच्या पायथ्याशी साखरपा जाधववाडी (ता. संगमेश्वर) येथे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चालकासह ९ प्रवासी किरकाेळ जखमी झाले आहेत.
कर्नाटक आगाराची रत्नागिरी - बेळगाव (केए २२, एफ २२६५) एसटी बस घेऊन चालक हंगड्याप्पा मर्याप्पा मर्यावर (४२, रा. चाैधरीनगर, बेळगाव) गुरुवारी निघाले हाेते. या गाडीमध्ये १३ प्रवासी हाेते. रत्नागिरी - काेल्हापूर महामार्गावरील आंबा घाटाच्या पायथ्याशी साखरपा - जाधववाडी येथे बस आली असता गाडीसमाेर काेंबडा आडवा आला. चालकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता गाडी बाजूला उलटली. गाडी जमिनीवर पडताच डिझेल टाकी लिकेज झाली आणि गाडीने पेट घेतला. गाडीने पेट घेताच प्रवाशांनी घाबरुन आरडाओरड सुरु केला.
ओरडण्याच्या आवाजाने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथूनच जवळ पाेलिस तपासणी नाका असल्याने तेथील पाेलिसही घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी गाडीच्या काचा फाेडून प्रवाशांना गाडीबाहेर सुखरुपपणे बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या दोन रुग्णवाहिकांतून साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच देवरुखचे पाेलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तर मुर्शी पोलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल संजय मारळकर, अर्पिता दुधाने, तानाजी पाटील हेही घटनास्थळी दाखल झाले हाेते. अधिक तपास साखरपा पोलीस करीत आहेत.
जखमींची नावे
प्रवीण शिवाजी पांचाळ (२३, रा. लोणी काळभोर, ता. जि. पुणे), मोसिन शाबुद्दीन मिरकर (३४, रा. रत्नागिरी), अश्पाक मुजावर (३१, रा. कुकडी, कोल्हापूर), आशुतोष कुमार (२९), राणी जॉर्ज (४५, रा. कनदनगर, सांगली), विकास कुमार शहा (२३, रा. शहापूर बिहार), सदाफ शेख (२२, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर), नाफीसा खान (४७, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर).