रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; जगबुडी पुन्हा इशारा पातळीवर

By शोभना कांबळे | Updated: July 14, 2023 17:55 IST2023-07-14T17:55:27+5:302023-07-14T17:55:47+5:30

काल, गुरुवारी रात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानंतर जगबुडी नदीची पातळी पुन्हा वाढू लागली

Rains increased in Ratnagiri district; Jagbudi again on alert level | रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; जगबुडी पुन्हा इशारा पातळीवर

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; जगबुडी पुन्हा इशारा पातळीवर

रत्नागिरी : जिल्ह्यात काल, गुरुवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, खेडमधील जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीने आज, शुक्रवारी इशारा पातळी ओलांडण्यास सुरुवात केली. मधूनच काही काळ विश्रांती घेऊन पावसाने जोर धरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण सुमारे ६०० मिलिमीटरने कमी आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत पावसाने जिल्हाभरात चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. गेल्या रविवारपासून चार दिवस गायब झालेला पाऊस गुरुवार रात्रीपासून संततधारेने पडण्यास सुरुवात झाली. सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मात्र, त्यानंतर रिमझिम सुरू होती. दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला. दिवसभर पावसाचे वातावरण कायम होते. दिवसभरात जोरदार सरी पडत असल्या तरीही अधूनमधून विश्रांती घेत पावसाची वाटचाल सुरू आहे.

पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. खेडमधील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत गेली होती. मात्र, ही पातळी इशारा पातळीपेक्षाही कमी झाली होती. मात्र, काल, गुरुवारी रात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानंतर जगबुडी नदीची पातळी पुन्हा वाढू लागली असून शुक्रवारी इशारा पातळीही ओलांडली. दरम्यान, हवामान खात्याने १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

Web Title: Rains increased in Ratnagiri district; Jagbudi again on alert level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.