रत्नागिरी : जवळपास आठवडाभर संततधारेने पडणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळपासून थोडी उसंत घेण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती ओसरण्यास मदत झाली. काही काळ सूर्यदर्शनही झाले. नद्यांचे पात्रही कमी झाले असून, जगबुडी नदी अजूनही धोका पातळीवर आहे. पाऊस कमी झाल्याने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. सलग पडलेल्या पावसाने जवळपास १५ टक्क्यांनी वाढ केली असून, येथील जिल्हा नियंत्रण कक्षात आतापर्यंतचा २४२०.८४ मिलिमीटर (७१.९६ टक्के) पाऊस नोंदविण्यात आला आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सकाळी १० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, सर्व तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दिवसभरात ठराविक सरीच पडत आहेत. पावसाने बुधवारी सकाळपासून विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील सहा प्रमुख नद्यांना आलेला पूरही आता ओसरला आहे.मात्र, खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीवर असून, राजापूरमधील कोदवली नदीनेही इशारा पातळी ओलांडलेली आहे. खेड, चिपळूण, राजापूर या शहरांमधील पूरस्थिती आता नियंत्रणाखाली असून, येथील नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या पावसाने सर्वच तालुक्यांमध्ये घरे, गोठे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.खेड तालुक्यात खेड - दापोली रस्ता बंद असल्याने खेड-शिवतर मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जालगाव गावतळे रस्ताही बंद असून, टाळसुरे-साखळोली मार्गाने वाहतूक सुरू आहे. चिपळूण तालुक्यात कऱ्हाड - चिपळूण मार्गावरील वाहतूकही हेळवाक मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने बंद ठेवण्यात आली होती. राजापूर शहरातही पाणी ओसरू लागले आहे. कोढेतड येथे चिंचबांध ते गणेशघाट रोडवर तसेच चिंचबांध ते वरची पेठ येथे जाणाऱ्या मार्गावरही बुधवारी सकाळी पुराचे पाणी आले होते.दापोली तालुक्यातील हर्णै, आसूद, दाभोळ येथील २८ व्यक्तींचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. चिपळूण तालुक्यातील ३१ कुटुंबांतील ७६ लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा येथील ८ नागरिकांनाही नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. बुधवारी सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने उसंत घेतली असून, हलक्या सरी पडत होत्या.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उसंत; पूरस्थिती ओसरली, जनजीवन पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:16 IST