रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उसंत, जगबुडी नदी इशारा पातळीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 14:32 IST2023-07-25T14:31:41+5:302023-07-25T14:32:27+5:30
गेले दाेन दिवस खेड तालुक्यातील जगबुडी व राजापूर तालुक्यातील कोदवली या दोन्ही नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उसंत, जगबुडी नदी इशारा पातळीवर
रत्नागिरी : गेला आठवडाभर संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारपासूनच कमी झाला आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. राजापूर तालुक्यातील काेदवली नदीचेही पाणी इशारा पातळीच्या खाली आले आहे. मात्र, खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे पाणी अजूनही इशारा पातळीच्या वर आहे. या नदीची पाणी पातळी ६.२५ मीटर इतकी आहे.
जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८:३० वाजता सरासरी ५२.६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दि. २७ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट घोषित केले असून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, सोमवारी सकाळी कडकडीत ऊन पडले हाेते. दुपारनंतर सरीवर काेसळणाऱ्या पावसाने सायंकाळी ४ वाजल्यानंतर पुन्हा काेसळण्यास सुरुवात केली. गेले दाेन दिवस खेड तालुक्यातील जगबुडी व राजापूर तालुक्यातील कोदवली या दोन्ही नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते.
मात्र, दुपारी काेदवली नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली आले. मात्र, जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते. तसेच वाशिष्ठी (चिपळूण), शास्त्री, सोनवी (संगमेश्वर), काजळी, मुचकुंदी (लांजा), बावनदी या सर्व नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. कोयना धरण भरले असून कोळकेवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, रायगड येथील दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील सवतसडा आणि अडरे धरणाच्या परिसरात निसर्गप्रेमींना बंदी घालण्यात आली आहे. ६ ऑगस्टपर्यंतही बंदी असणार आहे. याविषयी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले असून, सोमवारी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.