कोयनेच्या अवजलातून कोकणची तहान भागवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:59 IST2020-12-11T17:58:32+5:302020-12-11T17:59:59+5:30
Konkan, Chiplun, Water, Koyna, Ratnagirinews कोकणात सिंचन क्षेत्र कसे वाढेल, याचा विचार या योजनेने प्राधान्याने करायला हवा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देत केली आहे.

कोयनेच्या अवजलातून कोकणची तहान भागवा
चिपळूण : वीजनिर्मितीनंतर कोयनेचे पाणी वाशिष्ठी नदीच्या माध्यमातून अरबी समुद्राला जाऊन मिळते. दरवर्षी ६७ टीएमसी पाणी वाया जात आहे. हे पाणी रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात खेळविल्यास वर्षानुवर्षे असलेली पाणी टंचाई कायमची दूर होईल.
हे अवजल मुंबई किंवा अन्यत्र नेण्यास कोणाचाही विरोध असता कामा नये. परंतु ही योजना आखताना कोकणची पाणी टंचाई कशी दूर होईल आणि कोकणात सिंचन क्षेत्र कसे वाढेल, याचा विचार या योजनेने प्राधान्याने करायला हवा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देत केली आहे.
कोयना अवजलाबाबत अनेक वेळा राज्य शासनाने वेगवेगळ्या समित्यांमार्फत अहवाल तयार केलेले आहेत. या अहवालांचा अभ्यास करुन मुंबईसह संपूर्ण कोकणची पाणी टंचाई दूर करण्याची क्षमता कोयनेच्या अवजलामध्ये आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन योजना तयार झाल्यास कोकण समृध्द होईल.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच आर्थिक तरतूदही झाली आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम सोडले आहे. या प्रकल्पामुळे कोकण रेल्वे मध्यरेल्वेशी जोडली जाणार आहे.
मुख्यमंत्री या नात्याने आपण त्याचा पाठपुरावा करावा. चिपळूण शहराची लोकसंख्या ८० हजारच्या वर गेली आहे. कोयनेचे अवजल चिपळूण शहराला मिळाल्यास लाखोंचे वीज बिल वाचणार आहे, असेही त्यांनी या मागणीत नमूद केले आहे.